नवी दिल्ली : भारतात रेल्वे हे केवळ प्रवासाचे साधन नसून, कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन जीवनाचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. गावे-शहरे यांना जोडणार्या लोकल, एक्स्प्रेसपासून हाय-स्पीड ‘वंदे भारत’सारख्या अनेक आधुनिक रेल्वेगाड्यांनी देशाचा चेहरामोहरा बदलून टाकला. पण, या रेल्वेगाड्या लोकांना एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेण्यासाठीच नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही गती देतात. त्यात विशेषत: मालवाहतुकीत रेल्वेची भूमिका फार मोठी आणि महत्त्वाची आहे. कोळसा, धान्य, सिमेंटपासून अनेक मोठ्या यंत्रांपर्यंत सर्व काही एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी मालगाड्यांद्वारे नेले जाते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, भारतात धावणार्या अनेक ट्रेनपैकी सर्वांत लांब ट्रेन कोणती? तिला किती डबे आहेत आणि ती का बांधली गेली असेल? याच ट्रेनविषयी जाणून घेऊ...
भारतातील सर्वात लांब ट्रेनविषयी फार कमी लोकांना माहीत असेल. सुपर वासुकी ट्रेन ही भारतातील सर्वात लांब ट्रेन म्हणून ओळखली जाते. ही विशेषत: कोळसा वाहून नेण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे. या ट्रेनला एकूण 295 डबे आहेत, जे सहा शक्तिशाली इंजिनद्वारे खेचले जातात. या ट्रेनची इंजिनासह लांबी सुमारे 3.5 किलोमीटर आहे, जेव्हा ती ट्रेन एखाद्या रेल्वेस्थानकावरून पुढे जाते तेव्हा तिला संपूर्ण फलाट ओलांडण्यासाठी चार मिनिटे लागतात.
स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय रेल्वेने सुपर वासुकी लाँच केली. वीज प्रकल्पांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय कोळसा पोहोचवणे, हा या मालवाहतूक करणार्या ट्रेनचा मुख्य उद्देश आहे. ही ट्रेन एकाच वेळी 27 हजार टन कोळसा वाहून नेऊ शकते, जो तीन हजार मेगावॉट क्षमतेच्या वीज प्रकल्पाला वीजनिर्मिती करण्यासाठी एका दिवसाकरिता पुरेसा आहे.
ही ट्रेन छत्तीसगडमधील कोरबा ते महाराष्ट्रातील नागपूरमधील राजनांदगावपर्यंत धावते. सुपर वासुकीला सुमारे 267 कि.मी.चा प्रवास करण्यासाठी 11 तास 20 मिनिटांचा अवधी लागतो. ही ट्रेन पाच मालगाड्यांना जोडून तयार करण्यात आली आहे. तिची मालवाहतुकीची क्षमता सामान्य मालगाडीपेक्षा तिप्पट आहे.
जर एखाद्या व्यक्तीने या ट्रेनचे डबे मोजत एकेक करून पुढे जायचे ठरवले, तर त्याला ट्रेनच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास एक तास लागेल. यावरून ही ट्रेन किती लांबलचक आहे, याचा अंदाज येईल.