नवी दिल्ली : भारतीय संगीत थेरपी प्रसूती कळा सोसणार्या महिलांमधील वेदना आणि चिंता लक्षणीयरीत्या कमी करते. हा निष्कर्ष डॉ. बी. आर. आंबेडकर स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, मोहाली येथील डॉक्टरांनी भारतात अशा प्रकारच्या पहिल्याच अभ्यासाद्वारे काढला आहे. ‘एम्स’च्या संचालिका प्रिन्सिपल डॉ. भवनीत भारती यांच्या नेतृत्वाखाली सहा डॉक्टर आणि दोन परिचारिकांनी केलेल्या या रँडमाईज्ड कंट्रोल्ड ट्रायलमध्ये असे दिसून आले की, ज्या महिलांना मानक प्रसूती उपचारांसोबत भारतीय संगीत थेरपी देण्यात आली, त्यांच्या वेदनांमध्ये त्वरित 27 टक्के आणि चिंतेमध्ये 67 टक्के घट झाली. विशेष म्हणजे हा सकारात्मक परिणाम दीर्घकाळ टिकून राहिला. या संशोधनामुळे संगीत थेरपी हे केवळ एक वरवरचे साधन नसून एक प्रभावी क्लिनिकल टूल असल्याचे सिद्ध झाले आहे.
डॉ. भारती यांनी सांगितले की, हा प्रवास संगीतापासून नाही, तर स्तनपानापासून सुरू झाला. प्रसूतीनंतर लवकर स्तनपान सुरू करण्याच्या सवयीवर काम करत असताना आमच्या लक्षात आले की, जोपर्यंत मातांना भावनिकद़ृष्ट्या सुरक्षित वाटत नाही, तोपर्यंत केवळ वैद्यकीय प्रोटोकॉल यशस्वी होऊ शकत नाहीत. लेबर रूममधील चिंता आणि भीती हे मोठे अडथळे होते. संगीताने आम्हाला प्रसूती प्रक्रियेचे मानवीयकरण करण्यास मदत केली आणि नंतर आम्ही त्याचे परिणाम वैज्ञानिकद़ृष्ट्या सिद्ध केले. हा अभ्यास डॉ. भारती यांच्या स्किन-टू-किन कॉन्टॅक्ट (आई आणि बाळाचा शारीरिक स्पर्श) आणि लवकर स्तनपान सुरू करण्याच्या कामातून विकसित झाला. प्रशिक्षित कर्मचारी आणि मजबूत प्रोटोकॉल असूनही, परिणाम सातत्यपूर्ण नव्हते. त्यातून असा निष्कर्ष निघाला की, लेबर रूम जरी वैद्यकीयद़ृष्ट्या सक्षम असल्या, तरी त्या भावनिकद़ृष्ट्या तणावपूर्ण असू शकतात, ज्यामुळे आई आणि बाळाचे नाते आणि सहकार्य यामध्ये अडथळा येतो. म्हणून लक्ष रिस्पेक्टफुल मॅटर्निटी केअर (आदरयुक्त मातृत्व सेवा) परिसंस्थेवर केंद्रित करण्यात आले. या प्रक्रियेत डॉ. अंजली यांचा सहभाग हा महत्त्वाचा ठरला.
डॉ. अंजली या लखनौच्या भातखंडे संगीत विद्यापीठातून भारतीय शास्त्रीय संगीताचे औपचारिक शिक्षण घेतलेल्या डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे मानसशास्त्राची पार्श्वभूमी आणि संगीत थेरपीमध्ये पीएच.डी. आहे. त्यांच्या कौशल्यामुळे संगीताचे रूपांतर केवळ करमणुकीत न राहता, ते न्यूरोसायन्स आणि संस्कृतीवर आधारित एक संरचित उपचार पद्धती बनले.
नेहमीच्या अभ्यासांमध्ये सामान्य वाद्यसंगीत वापरले जाते. परंतु, ‘एम्स’चा हा प्रयोग वैयक्तिक आणि सांस्कृतिकद़ृष्ट्या अर्थपूर्ण होता. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मातांना त्यांच्या भावनिक स्थितीनुसार शब्दबद्ध रचना, भक्ती संगीत आणि भारतीय शास्त्रीय रागांवर आधारित संगीत ऐकवण्यात आले. डॉ. भारती यांच्या मते, ‘प्रसूती ही केवळ शारीरिक प्रक्रिया नसून ती भावनिक आणि आध्यात्मिकदेखील आहे. संगीतामुळे मातांना आश्वस्तता, सन्मान आणि ओळखीची भावना मिळाली.’
या अभ्यासाची विश्वासार्हता जपण्यासाठी टीमने एक औपचारिक चाचणी आराखडा तयार केला. यामध्ये प्रसूती कळा सुरू असलेल्या 117 महिलांची निवड करण्यात आली. संगणक-व्युत्पन्न रँडमायझेशन वापरून, सहभागींना दोन गटांत विभागले गेले. एका गटाला फक्त मानक उपचार दिले गेले, तर दुसर्या गटाला मानक उपचारांसोबत भारतीय संगीत थेरपी देण्यात आली.