नवी दिल्ली : एक्सिओम-4 मोहिमेचे नेतृत्व करणारे भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला 15 जुलै रोजी आपली अंतराळ मोहीम यशस्वीपणे पूर्ण करून पृथ्वीवर परतले आहेत. या 20 दिवसांच्या प्रवासात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर त्यांना आलेले अनुभव, शिकायला मिळालेल्या गोष्टी आणि पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेताना आलेली गंमतीशीर आव्हाने याबद्दल त्यांनी स्वतः खुलासा केला आहे. ही मोहीम भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मोहिमेसाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. पृथ्वीवर परतल्यावर आपल्याला मोबाईल फोनही जड वाटत होता, लॅपटॉप तरंगेल असा समज होऊन तो बेडच्या कडेला ठेवताच तो पडला, असे त्यांनी म्हटले आहे.
शुभांशू शुक्ला आणि त्यांच्या Axiom-4 च्या सहकार्यांनी शुक्रवारी एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत आपल्या 20 दिवसांच्या अंतराळ मोहिमेचे अनुभव सांगितले. शुभांशू शुक्ला हे 1984 मध्ये राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले आहेत. या ऐतिहासिक क्षणाबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘41 वर्षांनंतर एक भारतीय अंतराळातून परतला आहे. पण ही केवळ एक उडी नव्हती, तर भारताच्या दुसर्या अंतराळ युगाची ही सुरुवात आहे. यावेळी आम्ही केवळ उड्डाण करण्यासाठी नाही, तर नेतृत्व करण्यासाठीही सज्ज आहोत. उळेा-4 मोहीम 25 जून रोजी फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून सुरू झाली होती आणि 15 जुलै रोजी पृथ्वीवर परतली.
लखनौमध्ये जन्मलेल्या शुभांशू शुक्ला यांनी सांगितले की, त्यांच्यासाठी सर्वात खास क्षण 28 जून रोजी आला, जेव्हा त्यांनी भारताच्या पंतप्रधानांशी संवाद साधला आणि त्यांच्या मागे भारताचा तिरंगा अभिमानाने फडकत होता. अंतराळ प्रवासातून परतल्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्याचा अनुभवही शुक्ला यांनी सांगितला. ‘जेव्हा मी अंतराळ मोहिमेवरून परतलो, तेव्हा मला फोटो काढण्यासाठी सांगितले गेले. त्यावेळी मला माझा मोबाईल फोनही खूप जड वाटत होता. जो फोन आपण दिवसभर हातात धरतो, तो आता जड वाटू लागला होता. त्यांनी आणखी एक गंमतीशीर घटना सांगितली. ‘मी माझा लॅपटॉप बेडच्या काठावर ठेवला आणि तो हवेतच तरंगत राहील या विचाराने सोडून दिला. पण गुरुत्वाकर्षणामुळे तो खाली पडला. सुदैवाने, जमिनीवर कार्पेट असल्यामुळे त्याचे नुकसान झाले नाही.’
या मोहिमेबद्दल बोलताना शुक्ला म्हणाले की, हा अनुभव त्यांच्या अपेक्षांपेक्षा खूपच जास्त होता. या मोहिमेतून ते खूप काही शिकले, जे भारताच्या आगामी ‘गगनयान’ मोहिमेमध्ये त्यांना मदत करेल. ऑगस्टच्या मध्यात भारतात परतणारे शुभांशु शुक्ला म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींनी अंतराळ स्थानकावर जे ‘होमवर्क’ करायला सांगितले होते, ते आम्ही पूर्ण केले आहे. यामध्ये संपूर्ण मोहिमेतील प्रत्येक गोष्टीची नोंद करणे समाविष्ट होते. मी सर्व काही डॉक्युमेंट केले आहे आणि ते शेअर करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला विश्वास आहे की, ती सर्व माहिती आपल्या गगनयान मोहिमेसाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण ठरेल.’