Electric Air Taxi | देशातील पहिल्या ‘इलेक्ट्रिक एअर टॅक्सी’च्या प्रोटोटाईपचे अनावरण 
विश्वसंचार

Electric Air Taxi | देशातील पहिल्या ‘इलेक्ट्रिक एअर टॅक्सी’च्या प्रोटोटाईपचे अनावरण

आयआयटी मद्रासच्या स्टार्टअपकडून होणार निर्मिती

पुढारी वृत्तसेवा

चेन्नई : रस्त्यांवरील प्रचंड वाहतूक कोंडीपासून (ट्रॅफिक जाम) भारतीय शहरांमधील नागरिकांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आता ट्रॅफिक जामचा सामना करावा लागू नये म्हणून थेट आकाशातील मार्ग खुला होणार आहे. चेन्नई येथील ‘आयआयटी मद्रास’ मधील स्टार्टअप ‘द ईप्लेन कंपनी’ने भारताच्या पहिल्या इलेक्ट्रिक एअर टॅक्सी 'e200X - PT01' च्या फुल-स्केल प्रोटोटाईपचे अनावरण केले आहे. हे विमान केवळ शहरांमधील प्रवासाचा वेळ मिनिटांवर आणणार नाही, तर भारतीय विमान वाहतूक क्षेत्राचे (एव्हिएशन) चित्र पार बदलून टाकण्याची क्षमता ठेवते.

आयआयटी मद्रासच्या डिस्कव्हरी कॅम्पसमध्ये असलेल्या ६०,००० वर्ग फूट पसरलेल्या नवीन उत्पादन युनिटमध्ये (मॅन्युफॅक्चरिंग युनिट) या एअरक्राफ्टचे अनावरण करण्यात आले. सुरक्षिततेचा विचार करता यामध्ये ६ लिफ्ट रोटर्स आणि ४ फॉरवर्ड प्रोपेलेर्स देण्यात आले आहेत. उड्डाणादरम्यान एखादी मोटर किंवा पंखा खराब झाला तरी उर्वरित पंखे एअरक्राफ्टला पूर्णपणे सुरक्षित सांभाळून ठेवतील. कंपनीचे संस्थापक आणि आयआयटी मद्रासचे प्राध्यापक सत्या चक्रवर्ती यांच्या मते, या एअर टॅक्सीचा पहिला वापर ‘एअर ॲम्ब्युलन्स’ म्हणून केला जाईल. वाहतूक कोंडीदरम्यान गंभीर रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात मिनिटांत पोहोचवण्यासाठी याचा मोठा फायदा होईल. त्यानंतर ते सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुले केले जाईल.

यामध्ये एका पायलटसह २०० किलोपर्यंतचा पेलोड वाहून नेला जाऊ शकतो. सुरक्षिततेच्या कडक मानकांचा विचार करून, एअरक्राफ्टच्या सुरुवातीच्या चाचण्या पायलटशिवाय घेतल्या जातील. प्राध्यापक चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रगत ‘फ्लाय-बाय-वायर’ तंत्रज्ञानामुळे आता पायलटशिवाय चाचणी घेणे पूर्णपणे सुरक्षित आहे. एअरक्राफ्ट सुरक्षिततेच्या सर्व निकषांवर खरे उतरेपर्यंत कोणत्याही माणसाला यात बसवले जाणार नाही. ‘इंडिगो’चे माजी अध्यक्ष आणि ईप्लेनचे बोर्ड मेंबर आदित्य घोष हे देखील या प्रोजेक्टचा भाग आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या एअर टॅक्सीची ग्राऊंड टेस्टिंग पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरू होईल. तसेच उड्डाण चाचणी (फ्लाईंग टेस्टिंग) २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. डीजीसीए (DGCA) कडून सर्व मंजुरी मिळाल्यानंतर पुढील ३ ते ५ वर्षांत ही सेवा व्यावसायिकदृष्ट्या सुरू केली जाऊ शकते. कंपनीला आतापर्यंत ८०० हून अधिक एअरक्राफ्टच्या ऑर्डर्स मिळाल्या असून, त्यांनी गुंतवणूकदारांकडून २१.५ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला आहे.

फ्लाईंग टॅक्सीची वैशिष्ट्ये

हेलिकॉप्टरसारखे टेक-ऑफ, विमानासारखी उड्डाण क्षमता : ही एअर टॅक्सी हेलिकॉप्टरप्रमाणे थेट वरच्या दिशेने उड्डाण करू शकते आणि विमानाप्रमाणे हवेत प्रवास करू शकते.

कमीत कमी जागेची गरज : या विमानाच्या लँडिंग आणि टेक-ऑफसाठी केवळ एका बास्केटबॉल कोर्टच्या अर्ध्या आकाराच्या जागेची म्हणजेच ८x११ मीटर जागेची गरज असेल.

विद्यमान पायाभूत सुविधांचा वापर : शहरांमध्ये नवीन व्हर्टिपोर्ट न उभारता रुग्णालयांच्या छत्र्यांवर (रूफटॉप) आणि सध्या उपलब्ध असलेल्या हेलिपॅडवर हे सहजरीत्या उतरवता येऊ शकते.

वजन आणि क्षमता : २.२ टन वजनाचे हे एअरक्राफ्ट एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे ११० किलोमीटरचे अंतर कापेल.

वेळेची बचत : मुंबई ते पुणे किंवा चेन्नई ते पुद्दुचेरी यांसारखे अंतर काही मिनिटांत पार करणे याद्वारे शक्य होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT