कानपूर : रोबोटिक्सच्या जगात आता भारतही मागे राहिला नाही. ‘xTerra रोबोटिक्स’ या कंपनीने ‘स्कॉर्प’(SCORP) नावाचा एक प्रगत चतुष्पाद (चार पायांचा) रोबो सादर केला आहे. या श्वानरूपातील पहिल्या अद्ययावत रोबोला ‘लेग्ड मोबाईल मॅनिपुलेटर’ असे म्हटले जाते. विशेष म्हणजे, या रोबोच्या निर्मितीत आयआयटी कानपूरचा मोलाचा वाटा आहे. मानवांसाठी धोकादायक असलेल्या ठिकाणी काम करण्यासाठी हा रोबो अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
साधारणपणे चाकांवर चालणार्या रोबोंना पायर्या, ढिगारे किंवा खडबडीत रस्त्यांवर चालणे कठीण जाते. मात्र, ‘स्कॉर्प’ या समस्यांवर सहज मात करतो. हा रोबो चार पायांच्या मदतीने कोणत्याही कठीण परिस्थितीत चालू शकतो. याला एक विशेष रोबोटिक हात देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने तो साधने पकडणे, तपासणी करणे किंवा धोकादायक वस्तू हाताळणे ही कामे सहज करू शकतो. हा रोबो ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) ने सुसज्ज असून पूर्णपणे भारतीय इंजिनिअरिंगचा नमुना आहे.
आव्हानात्मक वातावरणासाठी डिझाईन केले आहे. यात ‘इंटेलिजेंट गेट अल्गोरिदम’ वापरण्यात आले आहे, ज्यामुळे तो खडकाळ जमीन, पायर्या आणि अरुंद जागेतही स्वतःचा तोल सावरू शकतो. औद्योगिक वसाहती, मोठे प्लांट, बोगदे आणि आपत्तीग्रस्त भागात तो प्रभावीपणे काम करतो. हाय-रिझोल्यूशन कॅमेरे आणि सेन्सर्समुळे तो यंत्रसामग्री किंवा पाईपलाईनमधील बिघाड अचूकपणे शोधू शकतो. xTerra रोबोटिक्सच्या मते, हा रोबो केवळ पाळत ठेवत नाही, तर आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी संवादही साधू शकतो. वाहनांची तपासणी, स्मार्ट शहरांमधील कचरा व्यवस्थापन, अग्निशमन सुरक्षा आणि धोकादायक ठिकाणांचे मॉनिटरिंग करण्यासाठी याचा वापर होईल. यापूर्वी कंपनीने ‘SVAN M2'’ हा भारताचा पहिला व्यावसायिक चतुष्पाद रोबो विकसित केला होता, ज्याच्या अनुभवातून आता अधिक प्रगत ‘स्कॉर्प’ तयार करण्यात आला आहे.