Indonesia Shiva Temple 
विश्वसंचार

Indonesia Shiva Temple : इंडोनेशियातील सर्वात मोठ्या शिवमंदिराला ‘एएसआय’ देणार नवजीवन

पुढारी वृत्तसेवा

जकार्ता : भारत आता केवळ आपल्या सीमांच्या आतच नाही, तर सातासमुद्रापारही प्राचीन संस्कृती आणि वारसा जतन करण्याचे काम करत आहे. परदेशांतील मंदिरांचा जीर्णोद्धार करून त्यांना नवे रूप देण्याचे काम भारताने हाती घेतले आहे. कंबोडियातील जगप्रसिद्ध अंकोरवाट मंदिराला नवजीवन दिल्यानंतर, आता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) ची टीम इंडोनेशियातील सर्वात मोठ्या 'प्रम्बानन' हिंदू मंदिराचा कायापालट करण्यासाठी सज्ज झाली आहे. जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशिया देशात, ९ व्या शतकातील भगवान शिव, ब्रह्मा आणि विष्णू यांच्या या धामाला भारत आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने चमकावणार आहे.

इंडोनेशियाच्या प्रसिद्ध प्रम्बानन मंदिराच्या जीर्णोद्धारात मदत करण्याचा भारताचा निर्णय हा 'हेरिटेज डिप्लोमसी' म्हणजेच वारसा कूटनीतीचा एक मोठा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी इंडोनेशिया दौऱ्यात या विशेष प्रकल्पाची अधिकृत सुरुवात होण्याची शक्यता आहे. या सहकार्याला अंतिम रूप देण्यासाठी इंडोनेशियाचे सांस्कृतिक मंत्री फदली झोन यांनी नुकतीच एएसआय (एएसआय) च्या टीमची भेट घेतली. हा जीर्णोद्धार केवळ मुख्य मंदिरापुरता मर्यादित नसून, जवळील 'सेवू' आणि 'प्लाओसान' मंदिर परिसरांसह संपूर्ण सांस्कृतिक भूभागाचा यात समावेश असेल, यावर इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी भर दिला आहे. इंडोनेशियाच्या योग्यकार्ता येथे असलेले 'प्रम्बानन मंदिर' हे तिथले सर्वात मोठे हिंदू मंदिर संकुल असून, ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे. ९ व्या शतकातील या मंदिरात भगवान शिव, ब्रह्मा आणि विष्णू या त्रिमूर्तींची पूजा केली जाते, ज्यामध्ये शिवमंदिर हे सर्वात मुख्य आणि उंच आहे. या मंदिराचा दर्जा सुधारण्यासाठी 'एनास्टायलोसिस' तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या तंत्रज्ञानामध्ये मंदिराचे विखुरलेले मूळ दगड शोधून ते पुन्हा मूळ जागी बसवले जातात. नवीन दगडांचा वापर केवळ अत्यंत आवश्यक असेल तिथेच केला जातो. या कामात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जात आहे. भारताची 'एएसआय' टीम गेल्या अनेक वर्षांपासून आशियातील विविध देशांमध्ये प्राचीन वारसा वाचवण्याचे काम करत आहे. त्यामध्ये कंबोडिया, व्हिएतनाम, लाओस, श्रीलंका आदी अनेक देशांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT