कोहिमा : जर तुम्हाला भारतातून इतर देशात जायचे असेल तर फ्लाईटने जावे लागेल अथवा चांगला रस्ता शोधावा लागेल, पण देशातील एका घराविषयी तुम्हाला मोठे आश्चर्य वाटेल. कारण की या दोन खोल्यांच्या घरात तुम्ही पोहोचलात तर एक खोली ही भारतात तर दुसरी खोली ही दुसर्या देशात आहे. हे गाव आणि हे घर त्याच्या या ‘हटके’ कारणामुळे जगप्रसिद्ध झाले आहे. जगातील अनेक लोक खास या घराला भेट देण्यासाठी कित्येक किलोमीटरचा प्रवास करत येतात. तुम्हाला हे गाव आणि हे घर कुठे आहे ते माहिती आहे का?
हे घर दोन देशांच्या सीमेवर आहे. या दोन खोल्यांच्या झोपडीवजा घरातील एक खोली भारताच्या हद्दीत तर दुसरी खोली ही आपला शेजारी देश ब्रह्मदेश म्हणजे आताचा म्यानमारमध्ये आहे. एकाच घरातून भारत आणि म्यानमारची सीमा जाते. हे अनोखे घर नागालँड राज्यातील लोंगवा गावात आहे. हे गाव भारत-म्यानमारच्या सीमेवर वसलेले आहे. हे अनोखे घर पाहण्यासाठी दूरवरून लोक येतात.
कित्येक किलोमीटरचा प्रवास करून आलेले लोक येथील निसर्गाच्याही प्रेमात पडतात. या घराचं एक खास वैशिष्ट्ये म्हणजे याचे किचन म्यानमार या देशात आहे, तर बेडरूम भारतात आहे. यामुळे या घरात झोपण्यासाठी भारतात यावे लागते. तर पोट भरण्यासाठी म्हणजेच स्वयंपाकासाठी थेट म्यानमार देशात जावे लागते. हे अंतर चार बोटं देखील नाही. विशेष म्हणजे हे घर गावातील प्रमुखाचे आहे. त्याच्या घरातून दोन्ही देशाची सीमा जाते. या घराला फ्री मुव्हमेंट रिझीमचा खास दर्जा देण्यात आला आहे. असा दर्जा प्राप्त हे एकमेव घर आहे. या घरातील नागरिकांना दुहेरी नागरिकत्व मिळालेले आहे. ते भारतीय नागरिक आहेतच तर म्यानमारचेही ते रहिवाशी आहेत. बाजारापासून ते इतर अनेक सेवांसाठी येथील लोक हे दोन्ही देशात मुक्तपणे संचार करतात.