Colorful Rice | भारतात होते ‘या’ रंगीबेरंगी तांदळाचे उत्पादन Pudhari File Photo
विश्वसंचार

Colorful Rice | भारतात होते ‘या’ रंगीबेरंगी तांदळाचे उत्पादन

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : आपल्या देशात पांढर्‍या तांदळाचे सेवन खूप जास्त केले जाते. अशातच बहुतेक आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, पांढरा तांदूळ हा आहारात खूप कमी प्रमाणात समाविष्ट करावा. कारण पांढर्‍या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा सुमारे 70 ते 90 इतका जास्त आहे. तसेच यामध्ये कमी पोषक तत्त्वेदेखील असतात आणि साधे कार्बोहायड्रेटस् मोठ्या प्रमाणात आढळतात, त्यामुळे त्याचे जास्त सेवन केल्याने वजन वाढू शकते. लठ्ठपणामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. अशातच ज्या लोकांना आधीच मधुमेह आहे त्यांनी विशेषतः पांढरा तांदूळ खाणे टाळावे, अन्यथा रक्तातील साखर वाढू शकते. यासाठी पांढर्‍या तांदळाव्यतिरिक्त आपल्या देशात अनेक प्रकारचे तांदूळ पिकवले जातात, जे पोषक तत्त्वांनी समृद्ध असून त्यांच्यात ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण देखील कमी आहे.

काळा तांदूळ : भारतातील ईशान्येकडील असलेले राज्यं मणिपूर आणि आसाममध्ये काळा तांदूळ पिकवला जातो. अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेल्या या काळ्या तांदळाला तेथे ‘चाक हाओ’ असे म्हणतात. या तांदळाचा काळा रंग अँथोसायनिन नावाच्या अँटिऑक्सिडंटपासून येतो. या तांदळाच्या सेवनाने मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण होते.

लाल तांदूळ : आसाम किंवा ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये हा लाल तांदूळ पिकवला जातो. तिथे याला ‘बाओ-धान’ असेही म्हणतात. ही तांदळाची एक अतिशय लोकप्रिय जात आहे आणि बाजारात सहज उपलब्ध आहे. उत्तरकाशी आणि बागेश्वरमध्येही या लाल तांदळाचे पीक घेतले जाते.

नवारा भात : भारतात आढळणार्‍या विविध तांदळाच्या जातींपैकी, नवारा तांदूळ हा देखील एक असा प्रकार आहे जो अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. केरळमध्ये पिकवल्या जाणार्‍या या तांदळात अँटिऑक्सिडंटस्,जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात, म्हणून ते लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर मानले जाते.

काळे जिरे भात : याला कोरापूट काळे जिरे तांदूळ असेही म्हणतात. हे तांदूळ त्यांच्या सुगंध आणि आश्चर्यकारक चवीसाठी ओळखले जातात आणि त्यांचा रंग काळा असतो आणि ते लहान जिर्‍यासारखे दिसतात. ओडिशातील कोरापूटमध्ये हा तांदूळ मोठ्या प्रमाणात पिकवला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT