चंद्रावर पाणी आले कुठून? Pudhari File Photo
विश्वसंचार

चंद्रावर पाणी आले कुठून?

भारताच्या चांद्रयान-1 मोहिमेदरम्यान चंद्रावर पाण्याच्या अस्तित्वाची पुष्टी

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : एकेकाळी जगभरातील क्रमिक पुस्तकांमध्ये चंद्र हा कोरडाठाक असून त्यावर पाण्याचा लवलेशही नाही, असे शिकवले जात होते. मात्र भारताच्या चांद्रयान-1 मोहिमेदरम्यान चंद्रावर पाण्याच्या अस्तित्वाची पुष्टी झाल्यानंतर आता वैज्ञानिकांनी अखेर हेही शोधून काढले आहे की, चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी कसे तयार होते. दशकांपासून चालू असलेल्या या संशोधनाचा ‘नासा’च्या नेतृत्वाखालील वैज्ञानिक टीमने उलगडा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, चंद्रावर पाणी निर्माण होण्यासाठी सूर्यप्रकाश आणि सौर वार्‍याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.

या संशोधनानुसार, सूर्यापासून येणारे अत्यंत वेगाने प्रवास करणारे हायड्रोजनचे प्रोटॉन चंद्राच्या वायुरहित पृष्ठभागावर ताशी दशलक्ष मैलांपेक्षा अधिक वेगाने आदळतात. पृथ्वीप्रमाणे चंद्राजवळ कोणतेही चुंबकीय क्षेत्र किंवा वातावरण नसल्यामुळे या कणांची थेट चंद्रमातीशी टक्कर होते. या टकरीदरम्यान, प्रोटॉन इलेक्ट्रॉनचे संयोजन करून हायड्रोजन अणूंमध्ये रूपांतरित होतात. हे हायड्रोजन अणू चंद्राच्या खनिजांतील ऑक्सिजन अणूंशी संयोजन करून हायड्रॉक्सिल (जक) आणि पाण्याचे (क2ज) अणू तयार करतात. ही प्रक्रिया चंद्राच्या रेगोलिथ (मृत्तिका) मध्ये केवळ काही मिलिमीटर खोलीपर्यंत घडते. या सिद्धांताची पुष्टी करण्यासाठी नासाचे वैज्ञानिक ली हसिया येओ आणि जेसन मॅकलेन यांनी एक विशेष प्रयोगशाळा तयार केली. या प्रयोगशाळेत सूर्याच्या सौर वार्‍याची कृत्रिम निर्मिती करून अपोलो 17 मोहिमेतील चंद्रमातीच्या नमुन्यांवर प्रयोग करण्यात आले. या प्रयोगात चंद्राच्या निर्वात वातावरणाचीही नक्कल करण्यात आली होती आणि पृथ्वीवरील कोणत्याही आर्द्रतेचा परिणाम होऊ नये म्हणून नमुने पूर्वीच गरम करून निर्जलित करण्यात आले. या प्रयोगातून हे स्पष्ट झाले की चंद्रावर पाणी फक्त पूर्वीच्या काळात तयार झालेले अवशेष नाही, तर सौर वार्‍याच्या सातत्यपूर्ण संपर्कामुळे आजही पाण्याचे अणू तयार होत असतात. यामुळे चंद्रावर एक गतिशील जलचक्र असल्याचे संकेत मिळाले आहेत. नासाचा आर्टेमिस प्रकल्प, ज्यामध्ये भविष्यात माणसांना चंद्रावर स्थायिक करणे हे उद्दिष्ट आहे, त्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते. कारण यामुळे चंद्रावर पाण्याची सतत उपलब्धता असू शकते, विशेषतः त्या ठिकाणी जिथे सौर वार्‍याचा प्रभाव अधिक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT