Historic currency note | फाळणीवेळी नोटेवर होता भारत अन् पाकचा उल्लेख 
विश्वसंचार

Historic currency note | फाळणीवेळी नोटेवर होता भारत अन् पाकचा उल्लेख

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या एका दुर्मीळ नोटेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्याने इतिहासप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. ही नोट 1947 च्या फाळणीच्या काळातील असून, तिचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यावर भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांच्या सरकारांचा उल्लेख आहे.

एकाच नोटेवर दोन सरकारे

व्हायरल झालेल्या 1 आणि 5 रुपयांच्या या दुर्मीळ नोटेवर एका बाजूला ‘गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया’(भारतीय रिझर्व्ह बँक : आरबीआय) आणि दुसरीकडे ‘गव्हर्न्मेंट ऑफ पाकिस्तान’ असे छापलेले आहे. इतकेच नाही तर काही नोटांवर उर्दूमध्ये ‘हुकूमत-ए-पाकिस्तान’ असे ओव्हरप्रिंट देखील करण्यात आला होते.

फाळणीच्या वेळी मालमत्तेची विभागणी करताना आणि पाकिस्तानला पेमेंट करण्यासाठी याच नोटांचा वापर करण्यात आला होता. आरबीआयने निभावली होती दुहेरी भूमिका फाळणीनंतरही दोन्ही देशांमध्ये अनेक गोष्टी समान होत्या. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) डिसेंबर 1948 पर्यंत दोन्ही देशांसाठी मध्यवर्ती बँक म्हणून काम करत होती. पाकिस्तानला स्वतःचे चलन तयार करण्यासाठी वेळ लागणार होता, त्यामुळे सुरुवातीच्या काळात ब्रिटीश इंडियाच्या नोटांवर पाकिस्तान सरकार असा शिक्का मारून त्या चलनात आणल्या गेल्या होत्या.

एका वर्षातच ठरल्या रद्दी

काही इतिहास अभ्यासकांनी सांगितलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने जवळपास एक वर्ष भारतीय चलनाचा वापर केला. एप्रिल 1948 पासून विशेष नोटा जारी करण्यात आल्या, त्या फक्त पाकिस्तानमध्येच वैध होत्या आणि भारतात चालत नसत. 1, 2, 5, 10 आणि 100 रुपयांच्या अशा नोटा जारी केल्या गेल्या. मात्र, वर्षभरानंतर पाकिस्तानने स्वतःचे स्वतंत्र चलन आणले आणि या ओव्हरप्रिंटेड नोटा रद्दी झाल्या.

संग्राहकांमध्ये मोठी मागणी

नोटेचे दुर्मिळत्व पाहता, जुन्या वस्तूंचा संग्रह करणार्‍या संग्राहकांमध्ये या नोटेची मोठी किंमत आहे. चांगल्या स्थितीतील अशा नोटेचे मूल्य आज हजारो रुपयांमध्ये असू शकते. हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले असून, फाळणीच्या त्या धामधुमीतही दोन्ही देश एकाच चलनाने कसे जोडलेले होते, यावर आश्चर्य व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT