वॉशिंग्टन : जग लवकरच पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात लहान दिवसाचा अनुभव घेऊ शकते. खगोल भौतिकशास्त्रज्ञांनी एका संशोधनाच्या आधारे दावा केला आहे की, गेल्या पाच वर्षांपासून पृथ्वीच्या फिरण्याचा वेग वाढला आहे. 2020 पासून पृथ्वी आपल्या अक्षावर सामान्यापेक्षा जास्त वेगाने फिरत असून, त्यामुळे आपल्याला इतिहासातील सर्वात लहान दिवसाचा अनुभव येऊ शकतो. म्हणजेच, हा दिवस 24 तासांपेक्षा कमी असेल.
खगोल भौतिकशास्त्रज्ञ ग्रॅहम जोन्स यांच्या मते, हा सर्वात लहान दिवस यावर्षीच 9 जुलै, 22 जुलै किंवा 5 ऑगस्ट रोजी पाहायला मिळू शकतो. शास्त्रज्ञांच्या मते, चंद्राच्या कक्षेचा पृथ्वीवर होणार्या परिणामामुळे हे घडत आहे. हा दिवस सामान्य दिवसापेक्षा 1.66 मिलिसेकंदांपेक्षा जास्त लहान असेल. एक सौर दिवस बरोबर 86,400 सेकंद म्हणजेच 24 तासांचा असतो, परंतु पृथ्वीच्या फिरण्याचा वेग कधीही पूर्णपणे स्थिर राहिलेला नाही.
संशोधनानुसार, 2020 पासून एका अज्ञात कारणामुळे आपला ग्रह वेगाने फिरू लागला, ज्यामुळे दिवसाचा कालावधी कमी झाला आहे. 2021 मध्ये एक दिवस सामान्यपेक्षा 1.47 मिलिसेकंद कमी नोंदवला गेला. 2022 मध्ये तो 1.59 मिलिसेकंद कमी झाला आणि 5 जुलै 2024 रोजी तर एक नवा विक्रमच नोंदवला गेला, जेव्हा दिवस सामान्य 24 तासांपेक्षा 1.66 मिलिसेकंद लहान होता. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, 2025 मधील 9 जुलै, 22 जुलै आणि 5 ऑगस्ट या अशा अंदाजित तारखा आहेत, जेव्हा चंद्राची कक्षा पृथ्वीच्या विषुववृत्तापासून सर्वात दूर असते.
याचा परिणाम पृथ्वीवर होतो आणि दिवस 24 तासांपेक्षा लहान होतो. विशेष म्हणजे, चंद्र अब्जावधी वर्षांपासून पृथ्वीच्या फिरण्याचा वेग कमी करत आहे. सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवरील एक दिवस फक्त तीन ते सहा तासांचा असायचा, पण चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील दिवसाचा कालावधी 24 तासांपर्यंत वाढला. दिवसाचा कालावधी काही मिलिसेकंद कमी झाल्याने सामान्य जनजीवनावर कोणताही परिणाम होत नाही. मात्र, तंत्रज्ञान आणि दूरसंचार, विशेषतः उपग्रह आणि GPS प्रणालीसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.