कोरोना महामारी ही आरोग्यासाठी तर धोकादायक आहेच, याशिवाय ती अमेरिकेत सायकलसाठीही धोकादायक ठरू लागली आहे. आश्चर्य नको, कारण आकडेवारीच हे सर्वकाही सांगते. जगातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्कमध्ये कोरोना महामारी काळात सायकल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. येेथे साईड वॉक, गॅरेज अथवा बिल्डिंगच्या बेसमेंटमधूनही सायकलींची चोरी करण्यात येत आहे. लोक तर म्हणत आहे की, चोरी टाळण्यासाठी सायकलला जवळ घेऊन झोपा, असा सल्ला न्यूयॉर्कवासीय देताना दिसत आहेत. गंभीर बाब म्हणजे ब्रिटन आणि फ्रान्समध्येही सायकल चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे.
एकापाठोपाठ अनेक सायकली गमावलेल्या जॅकब प्रिल यांनी सांगितले की, ज्यावेळी तुम्ही सायकल खरेदी करता, त्यावेळी ती दीर्घकाळ आपल्यासोबत राहावी, असे वाटणे साहजिकच आहे. मात्र, न्यूयॉर्कमध्ये सध्या अशी स्थिती झाली आहे की, तुम्ही चुकून घराबाहेर सायकल उभी केली असेल तर सकाळी तुम्ही नवी सायकल खरेदी करण्यास सज्ज असले पाहिजे.
तर एका सायकल दुकानात काम करणार्या स्टाई गोंजलेजने सांगितले की, सायकलीला कसलाही लॉक असला तरी तो तोडला जात आहे. जर फारच चांगला लॉक असेल तर तुम्हा दोहोंची साथ लांबेल; पण फार काळ नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी मार्च ते सप्टेंबर या काळात सायकल चोरीच्या 4447 घटना घडल्या आहेत. याच काळात गतसाली 3507 सायकली चोरीस गेल्या होत्या.एका संस्थेच्या दाव्यानुसार अमेरिकेत सध्या प्रत्येक 30 सेकंदाला एक सायकलची चोरी होत आहे.