Weather Alerts Meaning IMD | हवामान खात्याच्या चार अलर्टस्‌चा अर्थ  
विश्वसंचार

Weather Alerts Meaning IMD | हवामान खात्याच्या चार अलर्टस्‌चा अर्थ

पुढारी वृत्तसेवा

जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या प्रारंभी पावसाने महाराष्ट्रात जोरदार एन्ट्री केली आहे. मुंबईसह राज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाळा सुरू झाला की आपण टीव्ही, वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावर हवामान खात्याचे वेगवेगळे अलर्ट पाहत असतो. मात्र, या रेड, ऑरेंज किंवा यलो अलर्टचा नेमका अर्थ काय, कोणत्या अलर्टला किती पाऊस पडतो आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे, याची माहिती बहुतांश लोकांना नसते. हवामान खात्याच्या याच इशाऱ्यांमागील नेमके गणित आणि त्यांचे अर्थ सोप्या भाषेत समजून घेऊयात.

रेड अलर्ट जेव्हा हवामान विभागाकडून २०४ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पावसाची शक्यता असते, तेव्हा रेड अलर्ट जारी केला जातो. याचा अर्थ अत्यंत मुसळधार पाऊस, अतिवृष्टी, पूर, भूस्खलन किंवा ढगफुटी होण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाला तत्काळ सज्ज व्हावे लागते. नदी आणि नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे हे प्रशासनाचे मुख्य काम असते. या अलर्ट दरम्यान नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये आणि धोकादायक भागांत जाणे पूर्णपणे टाळावे.

ऑरेंज अलर्ट

ज्यावेळी ११५ ते २०४ मि.मी. दरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज असतो, तेव्हा ऑरेंज अलर्ट दिला जातो. या काळात मुसळधार पावसाची शक्यता जास्त असते आणि नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते. या अलर्टच्या काळात वीजपुरवठा खंडित होणे किंवा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होणे अशा समस्या निर्माण होतात. यामुळे प्रशासनाला आधीच सर्व आवश्यक उपाययोजना कराव्या लागतात. नागरिकांनीदेखील ऑरेंज अलर्ट असताना अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन केले जाते.

यलो अलर्ट

हवामान खात्याच्या मते, जेव्हा एखाद्या भागात ६४ मि.मी. ते ११५ मि.मी. दरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असते, तेव्हा यलो अलर्ट दिला जातो. हा एक प्रकारे पुढील येणाऱ्या संकटाचा इशारा असतो. या काळात संभाव्य नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश प्रशासनाकडून सर्व संबंधित यंत्रणांना दिले जातात. नागरिकांसाठी हा अलर्ट म्हणजे केवळ सावधगिरी बाळगण्याचा आणि हवामानावर लक्ष ठेवून राहण्याचा इशारा असतो.

ग्रीन अलर्ट

जेव्हा एखाद्या ठिकाणी केवळ १५ मि.मी. ते ६४ मि.मी. दरम्यान सामान्य पाऊस अपेक्षित असतो, तेव्हा हवामान विभाग ग्रीन अलर्ट जारी करतो. याचा अर्थ परिस्थिती पूर्णपणे सामान्य असून, चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. या काळात प्रशासनाला कुठलेही निर्बंध घालण्याची गरज पडत नाही. नागरिक कोणत्याही भीतीशिवाय आपला प्रवास करू शकतात आणि आपले नियमित दैनंदिन व्यवहार सुरू ठेवू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT