2045 Time Traveler | ‘मी २०४५ मधून आलोय’; स्वयंघोषित टाईम ट्रॅव्हलरचा दावा 
विश्वसंचार

2045 Time Traveler | ‘मी २०४५ मधून आलोय’; स्वयंघोषित टाईम ट्रॅव्हलरचा दावा

एलियनशी संपर्कापासून ब्रेन चिपपर्यंत वर्तवला भविष्याचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : स्वतःला २०४५ सालातून वर्तमानात परतलेला ‘टाईम ट्रॅव्हलर’ (वेळ प्रवास करणारा) म्हणवणाऱ्या एका व्यक्तीच्या दाव्यांनी सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. ॲडम आर्चन नावाच्या या व्यक्तीने पुढील १९ वर्षांत जगात घडणाऱ्या अनेक मोठ्या बदलांविषयी दावे केले असून, त्यामध्ये एलियन्सशी (परग्रहवासीयांशी) संपर्क, मानवी शरीरात मायक्रोचिप आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्यापक वापर यांचा समावेश आहे. एपेक्स टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ॲडमने दावा केला की, तो २०४५ मधून २०२६ मध्ये आला आहे.

मुलाखतीदरम्यान तो पॉलीग्राफ (लाई डिटेक्टर) चाचणीला जोडलेला होता आणि त्याच्या उत्तरांमध्ये खोटेपणा आढळला नसल्याचा दावा करण्यात आला. ॲडमच्या मते, २०२८ पर्यंत मानवाचा एलियन संस्कृतीशी अधिकृत संपर्क होईल. तसेच २०४५ पर्यंत जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात ‘द वन’ नावाची मायक्रोचिप बसवली जाईल. या चिपच्या मदतीने लोक थेट इंटरनेटशी जोडले जातील, विचारांच्या माध्यमातून संवाद साधतील आणि अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतील, असा त्याचा दावा आहे.

याशिवाय, भविष्यात मानव आणि यंत्र यांच्यातील सीमारेषा धूसर होईल, ब्रेन चिपच्या मदतीने नैराश्य, ऑटिझम, लठ्ठपणा आणि इतर काही आजारांवर उपचार शक्य होतील, असेही त्याने सांगितले. त्याचे हे दावे एलन मस्क यांच्या न्यूरालिंकसारख्या मेंदू-चिप तंत्रज्ञानाशी साधर्म्य दर्शवतात. मात्र, एलियनशी संपर्क, टाईम ट्रॅव्हल किंवा २०४५ मधून परत आल्याचा दावा याला कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे तज्ज्ञांनी या दाव्यांकडे मनोरंजन किंवा वैयक्तिक दावे म्हणूनच पाहण्याचा सल्ला दिला आहे. या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, काही जण हे दावे खरे मानत आहेत, तर अनेकांनी त्याला केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न किंवा काल्पनिक कथा असल्याचे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT