चेन्नई : बहुतेक अपघातांचे कारण वाहनातील बिघाड नसून मानवी चुका असतात. रात्रीच्या शांततेत अनेकदा थकव्यामुळे चालकाचे डोळे जड होतात आणि काही सेकंदांच्या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात घडतो. भारतातील महामार्गांवर होणाऱ्या प्राणघातक अपघातांमागे चालकाला येणारी झोप हे एक मुख्य कारण आहे. हीच समस्या दूर करण्यासाठी आयआयटी मद्रासच्या वैज्ञानिकांनी एक नावीन्यपूर्ण आणि स्वदेशी उपाय शोधून काढला आहे. आयआयटी मद्रासच्या ‘रिहॅबिलिटेशन बायोइंजिनिअरिंग ग्रुप’ने एक अशी स्मार्ट सीट तयार केली आहे, जी चालकाला झोप येण्यापूर्वीच त्याचा थकवा ओळखून जोरदार अलर्ट देते आणि अपघात होण्यापासून वाचवते. विशेष म्हणजे ही सीट कोणत्याही कॅमेऱ्याशिवाय किंवा तारांशिवाय काम करते. जाणून घेऊया नेमकी काय आहे ही ‘इंटेलिसीट’ (IntelliSeat) तंत्रज्ञान प्रणाली आणि ती कशी कार्य करते.
आयआयटी मद्रासच्या रिहॅबिलिटेशन बायोइंजिनिअरिंग ग्रुपने ‘हरिता’ या सीटिंग कंपनीसोबत मिळून ही सीट तयार केली आहे. या सीटला ‘इंटेलिसीट’ असे नाव देण्यात आले आहे. दिसायला ही नेहमीच्या कार सीटसारखीच दिसते; परंतु याच्या आत अत्यंत अत्याधुनिक सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या इतर तत्सम सीट्स चालकावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे, डोक्यावर पट्टी किंवा शरीरावर इलेक्ट्रोड्स (तारा) वापरतात. मात्र ‘इंटेलिसीट’ ही पूर्णपणे ‘नॉन-इन्ट्रासिव्ह’ आहे. म्हणजेच चालकाला शरीरावर काहीही परिधान करण्याची किंवा लावण्याची गरज नाही. कॅमेरा किंवा तारा नसताना ही सीट चालकाला झोप येत असल्याचे कसे ओळखते? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याचे उत्तर सीटच्या बॅकरेस्ट (पाठीचा भाग) आणि बेस (बसण्याचा भाग) मध्ये लपलेले आहे. यामध्ये बसवलेले सेन्सर्स चालकाच्या बसण्याची पद्धत, त्याची स्थिती आणि थकव्यामुळे शरीरात होणाऱ्या सूक्ष्म हालचाली अचूक टिपतात. स्नायूंचा थकवा मोजण्यासाठी ही सीट शरीरातून निघणारे हलके इलेक्ट्रिकल सिग्नल समजून घेण्याचा प्रयत्न करते. यामुळे पाठीचे आणि खांद्यांचे स्नायू कधी थकले आहेत हे स्पष्टपणे समजते.
या सीटचे वैशिष्ट्य म्हणजे ही जुन्या वाहनांमध्येही सहज बसवता येते. कोणत्याही ट्रक, बस किंवा कारमध्ये ही सहज फिट करता येईल अशा पद्धतीने ‘इंटेलिसीट’ डिझाईन करण्यात आली आहे. यासाठी गाडीत मोठे तांत्रिक बदल करण्याची गरज भासत नाही. फिट केल्यानंतर गाडीची चावी चालू करताच ही सीट कार्यरत होते आणि मोबाईल ॲपद्वारे रिअल-टाईम डेटा पाठवत राहते.
‘इंटेलिसीट’ची वैशिष्ट्ये
ही सीट चालकाचा थकवा तीन टप्प्यांत ओळखून तत्काळ ॲक्शन घेते :
सौम्य थकवा : डॅशबोर्डवर एक लहान लाईट पेटते, जी चालकाला फक्त सावध करते.
मध्यम थकवा : लाईटसोबतच एक बीप (ध्वनी अलर्ट) वाजतो.
गंभीर/जास्त थकवा : परिस्थिती जेव्हा जास्त धोकादायक असते, तेव्हा सीट स्वतःच थरथरू (कंपन करू) लागते. यासोबतच वाहनाच्या मालकाच्या मोबाईल ॲपवर त्वरित नोटिफिकेशन पाठवले जाते.