स्टॅनफोर्ड : रक्तदानाचे महत्त्व अर्थातच अनन्यसाधारण आहे. रक्त कोणत्याही फॅक्टरीत तयार होत नाही. त्यामुळे, त्याची उपलब्धता मानवी साखळीच्या माध्यमातूनच होऊ शकते. काही लोक रक्तदान शिबिरमध्ये जाऊन रक्तदान करतात. तर काही लोक ज्या व्यक्तीला रक्ताची गरज आहे, त्या व्यक्तीला थेट रुग्णालयात जाऊन रक्त देतात. ए, बी, एबी, ओ असे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे रक्त गट असतात आणि निरोगी प्रकृतीची कोणतीही व्यक्ती रक्तदान करू शकते. मात्र, कधी असा प्रश्न पडला आहे का की एकदा रक्तदान केले की किती दिवसांनी पुन्हा तितकेच रस्त शरीरात तयार होते? स्टॅनफोर्ड ब्लड सेंटरने यावरच एक संशोधन केले असून त्यांच्या अहवालानुसार पुरुष साधारणपणे 12 आठवड्यातून एकदा तर महिला 16 आठवड्यातून एकदा रक्तदान करू शकते.
या अहवालानुसार, रक्तदान केल्यानंतर शरीर लाल रक्तपेशी पुनर्प्राप्त करण्याची प्रक्रिया लगेच सुरू करते. रक्तातील काही घटक काही तासांत किंवा काही दिवसांत पूर्ववत होतात, तर काहींना पुनर्संचयन होण्यासाठी अधिक वेळ लागतो. रक्तदानानंतर अवघ्या 24 ते 48 तासांत शरीर प्लाझ्माची पुननिर्मिती करते. लाल रक्तपेशींची संपूर्ण पुननिर्मिती होण्यासाठी साधारणतः 4 ते 8 आठवडे लागतात. याशिवाय, रक्तातील लोहाची पातळी पूर्ववत होण्यासाठी 8 आठवड्यांपर्यंत वेळ लागू शकतो.
रक्तदानानंतर शरीराच्या पुनर्प्राप्तीला मदत कशी करावी, याचेही या अहवालात विवेचन करण्यात आले आहे. पाणी आणि द्रवपदार्थांचे सेवन वाढवणे, लोहयुक्त आहार घेणे, हिरव्या पालेभाज्या, संत्री, डाळी आणि नटस् यांचाआहारात समावेश करणे, तसेच, रक्तदानानंतर 24 तास पुरेसा आराम करणे आदींचा यात उल्लेख आहे. भारतातील आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एक निरोगी व्यक्ती 3 महिन्यांतून एकदा रक्तदान करू शकतो. पुरुषांसाठी 12 आठवड्यांनी आणि महिलांसाठी 16 आठवड्यांनी रक्तदान करणे सुरक्षित मानले जाते.