मृत्यूपूर्वी रुग्ण बोलतात ‌‘हे‌’ सारखेच शब्द 
विश्वसंचार

Hospital Secrets : मृत्यूपूर्वी रुग्ण बोलतात ‌‘हे‌’ सारखेच शब्द

आयसीयू नर्सचा धक्कादायक खुलासा

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : मृत्यू हा जीवनाचा अंतिम टप्पा आहे; पण तो येण्यापूर्वी माणसाला त्याचा आभास होतो का? अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका 29 वर्षीय परिचारिकेने यासंदर्भात केलेला दावा सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. ‌‘किर्स्टी रॉबर्टस्‌‍‌’ नावाच्या या नर्सने गेल्या चार वर्षांत आयसीयूमध्ये काम करताना अनेक रुग्णांना अंतिम श्वास घेताना पाहिले असून, त्या अनुभवावरून तिने काही थक्क करणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत.

किर्स्टीच्या मते, मृत्यूच्या अगदी काही क्षण आधी रुग्णांमध्ये एक प्रकारचा ‌‘आध्यात्मिक बदल‌’ दिसून येतो, जो वैद्यकीय परिभाषेत स्पष्ट करणे कठीण आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओला 6 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तिने सांगितले की, अंतसमयी अनेक रुग्ण अनेकदा ठरावीक वाक्येच बोलतात. रुग्ण वारंवार काय म्हणतात? ‌‘कृपया माझ्या कुटुंबाला सांगा की माझे त्यांच्यावर प्रेम आहे.‌’, ‌‘मला आता अजिबात बरं वाटत नाहीये.‌’ तसेच ‌‘मला वाटतंय की आता माझा मृत्यू जवळ आला आहे.‌’ आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रुग्ण असे बोलल्यानंतर काही वेळातच खरोखरच प्राण सोडतात.

किर्स्टीने एक विलक्षण निरीक्षण नोंदवले आहे. अनेकदा रुग्णांचे वैद्यकीय रिपोर्ट आणि ‌‘व्हाईटल साइन्स‌’ (जीवनरक्षक संकेत) पूर्णपणे सामान्य दिसतात. डॉक्टरांनाही कोणत्याही तत्काळ धोक्याची जाणीव होत नाही. मात्र, अचानक परिस्थिती बदलते आणि औषधे निष्प्रभ ठरू लागतात. ‌‘जणू काही आत्मा शरीराचा निरोप घेण्याची तयारी करत असतो,‌’ असे शब्द किर्स्टीने वापरले आहेत. ‌‘रुग्णांशी आणि त्यांच्या कुटुंबाशी आमचं एक नातं तयार होतं, त्यामुळे त्यांचा मृत्यू पाहणं कधीच सोपं नसतं. पण या अनुभवातून हेच शिकायला मिळतं की, जीवन म्हणजे केवळ भौतिक वस्तूंची साठवण नसून नाती आणि प्रेम जपणं आहे,‌’ असे किर्स्टी सांगते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इतर अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनीही स्वतःचे अनुभव शेअर केले आहेत. काही निवृत्त परिचारिकांनी लिहिले की, रुग्णांना त्यांच्या अंताचा अंदाज आधीच येतो. अनेक सामान्य नागरिकांनीही आपल्या नातेवाईकांच्या बाबतीत अशाच घटना घडल्याचे सांगितले आहे. काही वैज्ञानिक तज्ज्ञांच्या मते, जेव्हा शरीरातील अवयव निकामी होऊ लागतात, तेव्हा मेंदू विशिष्ट संकेत पाठवतो, ज्यामुळे रुग्णाला अस्वस्थता किंवा भीती वाटू शकते. मात्र, किर्स्टीचे असे मानणे आहे की, तिने जे पाहिले ते केवळ शारीरिक प्रक्रियेपेक्षा अधिक खोल आणि वेगळे काहीतरी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT