New Mexico ice cave | न्यू मेक्सिकोमध्ये ज्वालामुखीच्या गुहेत गोठलाय बर्फ 
विश्वसंचार

New Mexico ice cave | न्यू मेक्सिकोमध्ये ज्वालामुखीच्या गुहेत गोठलाय बर्फ

पुढारी वृत्तसेवा

न्यू मेक्सिको : निसर्गाच्या किमयेपुढे विज्ञानही थक्क होते, याचा प्रत्यय अमेरिकेतील न्यू मेक्सिकोमध्ये येतो. येथील ‘बँडेरा ज्वालामुखी आईस केव्ह’ हे पर्यटकांच्या आणि वैज्ञानिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या गुहेचे वैशिष्ट्य असे की, बाहेरील तापमान कितीही असले, तरी गुहेच्या आतील तापमान कधीही 31 अंश फॅरेनहाईट (-0.6 अंश सेल्सिअस) च्या वर जात नाही.

सुमारे 10,000 वर्षांपूर्वी ‘बँडेरा’ ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक झाला होता. यावेळी वाहणारा लाव्हा वरच्या थरावर थंड होऊन कडक झाला. मात्र, जमिनीखालील थरांमध्ये पोकळी निर्माण होऊन गुहा तयार झाल्या. या गुहेच्या विशिष्ट भूगर्भीय रचनेमुळे तिथे इतकी थंडी असते की, गेल्या 3,400 वर्षांपासून तिथे बर्फ साचलेला आहे. या गुहेच्या जमिनीवर वर्षभर सुमारे 20 फूट (6 मीटर) जाडीचा बर्फाचा थर असतो.

गोठवणार्‍या थंडीमुळे या बर्फावर ‘आर्क्टिक शेवाळ’ वाढले आहे. यामुळे बर्फावर निळसर-हिरव्या रंगांची जिवंत चादर पसरल्यासारखी वाटते. पर्यावरणतज्ज्ञ पॉल मॉरमॅन यांच्या मते, ‘हे न्यू मेक्सिकोमधील सर्वात विचित्र ठिकाण आहे, जिथे एकाच वेळी उष्णता आणि थंडीचा अनुभव येतो.’ ही गुहा एका कोसळलेल्या ‘लाव्हा ट्यूब’मध्ये स्थित आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर लाव्हा वाहून गेल्यावर मागे उरलेल्या पोकळ बोगद्याला लाव्हा ट्यूब म्हणतात. या गुहेच्या भिंती सच्छिद्र असून, तिचे प्रवेशद्वार अशा आकाराचे आहे की, ते बाहेरील गरम हवा आत येऊ देत नाही आणि आतील थंड हवा बाहेर जाऊ देत नाही.

पाऊस आणि वितळलेले बर्फ जेव्हा या गुहेत शिरते, तेव्हा संपर्कात येताच त्याचे रूपांतर पुन्हा बर्फात होते. बँडेरा ज्वालामुखी हा उत्तर अमेरिकेतील ‘सिंडर कोन’ प्रकारच्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचे एक उत्तम उदाहरण मानला जातो. हा उद्रेक अल्पकाळ पण अत्यंत स्फोटक होता. यामुळे तयार झालेले ज्वालामुखीचे सुळके आणि त्यावरील सैल खडकांमुळे यावर चढाई करणे अत्यंत कठीण असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT