सॅन अँटोनियो : अमेरिकेत मध्य टेक्सासमधील एका गुहेचे संशोधन करत असताना शास्त्रज्ञांच्या हाती जीवाश्मांचा मोठा खजिना लागला आहे. एका भूमिगत प्रवाहाच्या पात्रात शास्त्रज्ञांना हिमयुगातील नष्ट झालेली परिसंस्था सापडली असून, यात महाकाय कासव आणि सिंहाच्या आकाराच्या आर्मडिलोच्या नातेवाईक प्रजातीचे अवशेष आढळले आहेत.
‘क्वार्टरनरी रिसर्च’ या नियतकालिकात 19 मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासनिबंधानुसार, या गुहेत हिमयुगाच्या काळातील अशा प्राण्यांचे अवशेष असू शकतात जे तुलनेने उबदार कालखंडात अस्तित्वात होते. या शोधाला अधिकृत पुष्टी मिळाल्यास, मध्य टेक्सासच्या जीवाश्म नोंदींमधून गहाळ झालेला प्राण्यांचा समूह जगासमोर येण्याची ही दुर्मीळ संधी असेल. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास (ऑस्टिन) येथील पुराजीवशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक जॉन मोरेट्टी यांनी सांगितले की, ‘हे पाहून मी थक्कच झालो.
इतक्या मोठ्या प्रमाणात जीवाश्म मिळणे आणि ते ज्या प्राण्यांचे प्रतिनिधित्व करतात, ते खरोखरच थरारक आहे.‘2023 मध्ये मोरेट्टी आणि स्थानिक गुहा संशोधक जॉन यंग सॅन अँटोनियोजवळील ‘बेंडर्स केव्ह’चे सर्वेक्षण करत होते. या गुहेत पोहोचणे अत्यंत कठीण असून, तिथून एक भूमिगत प्रवाह वाहत असल्याने आतापर्यंत जीवाश्मशास्त्रज्ञांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, मोरेट्टी आणि यंग यांना हिमयुगातील हे जीवाश्म चिखलात पडलेले आढळले. 2023 ते 2024 दरम्यान केलेल्या सहा सफरींमध्ये मोरेट्टी आणि यंग यांना गुहेतील 21 वेगवेगळ्या भागांतून जीवाश्म गोळा करण्यात यश आले. यामध्ये प्रामुख्याने पुढील गोष्टींचा समावेश आहे.
जायंट स्लोथ : ‘मेगॅलोनिक्स जेफरसोनी’ नावाच्या महाकाय प्राण्याचा पंजा. मॅमथचे दात : प्राचीन हत्तींच्या प्रजातीचे दात. प्राचीन उंट : आधुनिक लामा प्राण्याचे पाय लांब असलेले पूर्वज. सर्वात महत्त्वाचा शोध : ‘पॅम्पायर’ आणि ‘महाकाय कासव’. संशोधकांना सर्वाधिक आकर्षित केले ते म्हणजे दोन विशिष्ट जीवाश्मांनी. यात ‘पॅम्पायर’ (Holmesina septentrionalis) नावाचा प्राणी आहे, जो आर्मडिलोचा महाकाय नातेवाईक असून, साधारण 7 लाख 81 हजार ते 1 लाख 26 हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. दुसरा महत्त्वाचा शोध म्हणजे ‘हेस्पेरोटेस्टुडो’ (Hesperotestudo) नावाच्या नामशेष झालेल्या महाकाय कासवाच्या प्रजातीचे अवशेष. या शोधामुळे हिमयुगातील हवामान आणि त्या काळातील प्राण्यांच्या जीवनशैलीवर नवा प्रकाश पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.