हरिद्वार : परदेशी पाहुणे जेव्हा भारतीय संस्कृतीत रंगून जातात, तेव्हा ते दृश्य नेहमीच खास असते. मात्र, जेव्हा एखादी व्यक्ती तब्बल १३ वर्षांपासून आपली भाषा आणि संस्कृती समजून घेत असेल आणि पूर्ण श्रद्धेने गंगेत स्नान करीत असेल, तर ते दृश्य थेट मनाला स्पर्शून जाते. सोशल मीडियावर जपानच्या एका कंटेंट क्रिएटरचा असाच एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यात ती केवळ पारंपरिक पोशाखातच दिसत नाही, तर अस्खलित हिंदी बोलतानाही पाहायला मिळत आहे.
इन्स्टाग्रामवर ‘मेयो जपान’ (@mayojapan) या नावाने प्रसिद्ध असलेली ही क्रिएटर मूळची जपानी आहे; परंतु तिचे मन मात्र पूर्णपणे ‘देशी’ आहे. ती सध्या मुंबईत राहत असून अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर म्हणून कार्यरत आहे. इन्स्टाग्रामवर तिचे सुमारे ९.४७ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मेयोने गेल्या १३ वर्षांत भारताला जवळून जाणून घेतलेच आहे, शिवाय येथील भाषाही तिच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनवली आहे.
हरिद्वारच्या घाटावरून शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये मेयोचा साधेपणा स्पष्टपणे दिसून येतो. व्हिडीओच्या सुरुवातीला ती हसतमुखाने अत्यंत स्पष्ट हिंदीत म्हणते, ‘‘आयुष्यात पहिल्यांदाच गंगेत स्नान करायला जात आहे.’’ नदीचा वेगवान प्रवाह पाहता तिने सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेतली. व्हिडीओमध्ये ती घाटावर लावलेली लोखंडी साखळी घट्ट पकडताना दिसते आणि सांगते, ‘‘मी साखळी पकडली आहे, जेणेकरून नदीच्या प्रवाहात मी वाहून जाऊ नये.
’’ यानंतर ती एका स्थानिक व्यक्तीला विचारते की, एवढ्या डुबक्या पुरेशा आहेत का? तीन वेळा डुबकी मारल्यानंतर, पाण्यात पूर्णपणे भिजलेली मेयो अत्यंत समाधानाने म्हणते, ‘‘व्यवस्थित स्नान झाले आहे... खूप छान वाटले.’’ आपला हा खास अनुभव शेअर करताना मेयोने इन्स्टाग्राम कॅप्शनमध्ये लिहिले, ‘‘१३ वर्षे हिंदी आणि भारतीय संस्कृती शिकल्यानंतर अखेर मी गंगेत पवित्र डुबकी मारली. खूप छान वाटत आहे. माझ्या आयुष्यात हा सुंदर आणि अनपेक्षित प्रवास घडवून आणल्याबद्दल भारताचे मनापासून आभार.’’