पृथ्वीच्या पोटात सापडला हायड्रोजनचा खजिना Pudhari File Photo
विश्वसंचार

पृथ्वीच्या पोटात सापडला हायड्रोजनचा खजिना

या हायड्रोजन स्रोताचा फक्त 2 टक्के वापर केला तरी 200 वर्षे जीवाश्म इंधनाची गरज भासणार नाही

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : पृथ्वीला आपल्याकडे ‘रत्नगर्भा’ असेही एक नाव आहे. सोने, चांदी, हिरे यासारख्या अनेक मौल्यवान पदार्थांना पोटात साठवून ठेवलेल्या पृथ्वीने मानवाला आजपर्यंत अनेक गोष्टी भरभरून दिलेल्या आहेत. आता पृथ्वीच्या पोटात सर्वात ‘पावरफुल’ खजिना सापडला आहे. हा खजिना म्हणजे सोने, चांदी किंवा कोणता मौल्यवान धातू नाही तर हायड्रोजन वायू आहे. हायड्रोजन वायूच्या खजान्यातील फक्त 2 टक्के वायूचा वापर करून पुढची 200 वर्ष संपूर्ण जगाला वीज पुरवठा होऊ शकतो.

पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली हा हायड्रोजनचा महामेरू सापडला आहे. या हायड्रोजन स्रोताचा फक्त 2 टक्के वापर केला तरी 200 वर्षे जीवाश्म इंधनाची गरज भासणार नाही, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली सुमारे 6.3 ट्रिलियन टन हायड्रोजन आहे. दगड आणि भूमिगत जलाशयात हा हायड्रोजनचा गुप्त खजिना दडलेला आहे. हा हायड्रोजनचा साठा पृथ्वीवर असलेल्या वायूच्या तुलनेत 26 पट जास्त आहे; पण हायड्रोजनचे नेमके स्थान शास्त्रज्ञांना माहीत नाही. जो सापडला आहे तो एकतर समुद्रात आहे किंवा किनार्‍यापासून दूर आहे किंवा खूप खोलवर. त्यामुळे येथून हायड्रोजन काढणे जवळपास अशक्य आहे. यूएसजीएस पेट्रोलियम जिओकेमिस्ट जेफ्री एलिस यांनी हायड्रोजनच्या साठ्याबाबत अधिक संशोधन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. मोठ्या प्रमाणात असलेला हा हायड्रोजनचा साठा म्हणजे स्वच्छ ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे. विशेषतः, वाहने चालवताना त्याचा फायदा होतो. त्यातून वीज निर्माण होऊ शकते. एवढ्या मोठ्या हायड्रोजन साठ्यापैकी फक्त 2 टक्के म्हणजे 124 कोटी टन संपूर्ण जगाला निव्वळ शून्य उत्सर्जनापर्यंत नेऊ शकतो. याचा वापर केल्यास पुढची 200 वर्षे जगात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. हायड्रोजनची समान मात्रा जीवाश्म इंधनाच्या दुप्पट ऊर्जा निर्माण करते असे भूगर्भशास्त्रज्ञ सारा गेल्मन यांनी सांगितले. सारा आणि जेफ्री यांचा याबाबतचा संशोधन अहवाल ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या विज्ञान नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. हायड्रोजनचे प्रमाण शोधण्यासाठी दोन्ही शास्त्रज्ञांनी पृथ्वीतून बाहेर पडणार्‍या हायड्रोजनचे मॉडेल तयार केले. जमिनीखाली नैसर्गिकरीत्या हायड्रोजनची निर्मिती होत राहते. दगडांमधील रासायनिक अभिक्रियामुळे हायड्रोजन तयार होतो. जेव्हा पाण्याचे दोन भाग होतात तेव्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोडला जातो. निसर्गात डझनभर प्रक्रिया आहेत ज्याद्वारे हायड्रोजन तयार होतो; पण त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे, असे जेफ्री यांनी सांगितले. जेव्हा शास्त्रज्ञांना पश्चिम आफ्रिका आणि अल्बेनियाच्या क्रोमियम खाणींमध्ये हायड्रोजनचा मोठा साठा सापडला तेव्हा शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या खालच्या पृष्ठभागावर हायड्रोजन शोधण्याचा अभ्यास सुरू केला. भविष्यातील हा महत्त्वाचा ग्रीन एनर्जी सोर्स ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT