Hydrogen from food waste | वाया जाणार्‍या अन्नापासून चक्क हायड्रोजननिर्मिती! 
विश्वसंचार

Hydrogen from food waste | वाया जाणार्‍या अन्नापासून चक्क हायड्रोजननिर्मिती!

रासायनिक उद्योगांसाठी पर्यावरणपूरक पर्याय शोधण्यात शास्त्रज्ञांना यश

पुढारी वृत्तसेवा

एडिनबर्ग : वाया जाणार्‍या अन्नापासून (उदा., ब्रेडचा चुरा) मिळणारा हायड्रोजन आता रासायनिक उत्पादनांमधील जीवाश्म इंधनाची जागा घेऊ शकतो, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. ‘नेचर केमिस्ट्री’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या शोधनिबंधानुसार, बॅक्टेरिया आणि धातू उत्प्रेरक (Metal Catalysis) यांच्या संयोगाने अन्नाच्या कचर्‍यापासून मौल्यवान रसायने तयार करणे शक्य झाले आहे.

‘हायड्रोजनेशन’ ही रासायनिक प्रक्रिया अन्न उत्पादन, प्लास्टिकनिर्मिती आणि औषधनिर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. सध्या या प्रक्रियेसाठी लागणारा बहुतांश हायड्रोजन वायू हा जीवाश्म इंधनापासून ‘स्टीम रिफॉर्मिंग’ या प्रक्रियेद्वारे मिळवला जातो. ही पद्धत अत्यंत ऊर्जाकेंद्रित असून, यात 1 किलो हायड्रोजन तयार करताना 15 ते 20 किलो कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो. हे रासायनिक उद्योगापुढील मोठे आव्हान आहे. एडिनबर्ग विद्यापीठातील केमिकल बायोटेक्नॉलॉजीचे प्राध्यापक स्टीफन वॉलेस यांनी या समस्येवर निसर्गाच्या मदतीने तोडगा शोधण्याचे ठरवले.

अनेक जीवाणू जेव्हा ऑक्सिजनशिवाय श्वसन करतात, तेव्हा ते नैसर्गिकरीत्या हायड्रोजन वायू बाहेर सोडतात. जर हा ‘बायो-हायड्रोजन’ रासायनिक प्रणालीशी जोडला, तर जीवाश्म इंधनाची गरज संपेल, असा विचार वॉलेस यांनी मांडला. ते म्हणतात, ‘सर्वात मोठे आव्हान अशा ‘कॅटॅलिस्ट’चा (उत्प्रेरक) शोध घेणे होते जो जिवंत पेशींना इजा न पोहोचवता पाण्यात आणि सामान्य तापमानात काम करू शकेल.’ संशोधकांनी ई. कोलाय बॅक्टेरियावर हा प्रयोग केला. त्यांनी बॅक्टेरिया असलेल्या मिश्रणात पॅलेडियम कॅटॅलिस्ट मिसळले आणि त्यातील ऑक्सिजन काढून टाकला.

98.6 अंश फॅरेनहाईट (37 अंश सेल्सिअस) तापमानावर एका दिवसासाठी ही प्रक्रिया ठेवल्यानंतर असे दिसून आले की, एका विशिष्ट बॅक्टेरियाच्या मदतीने तब्बल 94 टक्क्यांपर्यंत हायड्रोजनेशन उत्पादन मिळाले. या संशोधनातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, ही संपूर्ण प्रक्रिया ‘कार्बन-नेगेटिव्ह’ आहे. म्हणजेच, यातून कार्बन उत्सर्जित होण्याऐवजी तो कमी करण्यास मदत होते. अन्नाच्या कचर्‍याचा वापर करून शाश्वत रासायनिक उत्पादने बनवण्याच्या दिशेने हे पहिले मोठे पाऊल मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT