Temporary Husband Service | ‘या’ देशात घरकामासाठी मिळताहेत ‘तासाभराचे पती’ 
विश्वसंचार

Temporary Husband Service | ‘या’ देशात घरकामासाठी मिळताहेत ‘तासाभराचे पती’

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : युरोपमधील लॅटविया हा छोटा आणि निसर्गरम्य देश सध्या एका अनोख्या कारणामुळे जागतिक माध्यमांमध्ये चर्चेत आला आहे. लॅटवियामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या लक्षणीयरीत्या जास्त असल्याने तेथे महिलांना जोडीदार मिळणे कठीण झाले आहे. या समस्येमुळे सोशल मीडियावर ‘हजबंड फॉर वन अवर’ (तासाभरासाठी पती) ही सर्व्हिस मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मात्र, नावावरून असामाजिक किंवा रोमँटिक वाटणारी ही सेवा प्रत्यक्षात घरगुती कामांसाठी लागणाऱ्या कुशल कामगारांची बुकिंग सर्व्हिस आहे.

‘तासाभराचे पती’ सर्व्हिस काय आहे?

महिला ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा फोनद्वारे पुरुषांना तासाच्या किंवा दिवसाच्या हिशेबाने भाड्याने घेतात. हे पुरुष प्लंबिंग, कारपेंटर (सुतारकाम), वॉल पेंटिंग, टीव्ही फिटिंग किंवा पडदे लावणे यासारखी कष्टाची कामे करतात. या सेवेसाठी १ तासाचे सुमारे ४० ते ४५ डॉलर (सुमारे ३,५०० ते ३,८०० रुपये) आणि पूर्ण दिवसाचे २८० डॉलर आकारले जातात. रेमोंटडर्बी. एलव्‍ही किंवा कोमांडा २४ यांसारख्या प्लॅटफॉर्मवर यांची मागणी इतकी जास्त आहे की, एका महिन्याआधीच सर्व स्लॉटस्‌ बुक होतात.

या सेवेचा अर्थात सर्व्हिसचा कोणत्याही सामाजिक किंवा लग्नाच्या संबंधांशी थेट संबंध नसून, केवळ मीडिया आणि मार्केटिंगमुळे याला ‘पती भाड्याने देणे’ असे नाव मिळाले आहे.

काय आहे लिंग गुणोत्तर बिघडण्याचे मुख्य कारण :

आकडेवारीनुसार, लॅटवियामध्ये दर १०० पुरुषांमागे सुमारे ११५ ते ११६ महिला आहेत. ६५ वर्षांवरील वयोगटात तर महिलांची संख्या पुरुषांपेक्षा दुप्पट आहे. या देशातील पुरुषांचे सरासरी आयुष्यमान महिलांपेक्षा तब्बल १० ते ११ वर्षांनी कमी आहे. पुरुषांमध्ये धूम्रपान, मद्यपान आणि आरोग्याबाबत निष्काळजीपणाचे प्रमाण जास्त आहे. अनेक तरुण पुरुष रोजगाराच्या शोधात परदेशात स्थलांतरित होतात.या सर्व कारणांमुळे लॅटवियातील महिलांना घरगुती दुरुस्ती आणि मेहनतीच्या कामांसाठी अशा भाड्याच्या ‘हँडीमॅन’ सेवांवर अवलंबून राहावे लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT