Husband Silent for 20 Years | पत्नीशी २० वर्षे एकही शब्द न बोलणारा नवरा! 
विश्वसंचार

Husband Silent for 20 Years | पत्नीशी २० वर्षे एकही शब्द न बोलणारा नवरा!

पुढारी वृत्तसेवा

टोकियो : जपानमधील नारा शहरातील एका दाम्पत्याची अनोखी कहाणी पुन्हा चर्चेत आली आहे. पत्नी मुलांकडेच जास्त लक्ष देते, या मत्सरातून एका पतीने तब्बल २० वर्षे पत्नीशी एकही शब्द न बोलण्याचा निर्णय घेतला होता. अखेर त्यांच्या मुलाच्या प्रयत्नांमुळे ही दोन दशकांचा अबोला संपुष्टात आला.

ओटो कातायामा यांनी १९९७ मध्ये पत्नी युमी यांच्याशी बोलणे बंद केले. पत्नीचे संपूर्ण लक्ष मुलांकडे वळल्याने आपण दुर्लक्षित झालो, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली होती. त्यानंतर दोघे एकाच घरात राहत होते, एकत्र जेवत होते आणि तिघा मुलांचे संगोपनही करत होते. इतकेच नव्हे, तर या काळात त्यांच्या तिसऱ्या मुलाचाही जन्म झाला. मात्र, पत्नीशी संवाद साधताना ओटो केवळ मान हलवत किंवा अस्पष्ट आवाज काढत असत. विशेष म्हणजे ते आपल्या मुलांशी मात्र नेहमीप्रमाणे हसत-खेळत बोलत होते.

ही विचित्र परिस्थिती पाहून धाकटा मुलगा योशिकी याने २०१७ मध्ये एका जपानी टीव्ही कार्यक्रमाची मदत मागितली. कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी दोघांना त्यांच्या पहिल्या भेटीच्या ठिकाणी असलेल्या नारा पार्कमधील बाकावर आणले. तिथे ओटो यांनी २० वर्षांनंतर प्रथमच पत्नीशी संवाद साधत आपल्या वागण्याबद्दल माफी मागितली. पत्नी मुलांमध्ये गुंतल्यामुळे आपण स्वतःला एकटे समजू लागलो आणि त्यातूनच हा हट्टी निर्णय घेतल्याचे त्यांनी कबूल केले. या घटनेनंतर जपानमध्ये नातेसंबंधांतील ‘सायलेंट ट्रीटमेंट’ आणि भावनिक छळ यावर मोठी चर्चा सुरू झाली. मानसशास्त्रज्ञांच्या मते, जोडीदाराशी दीर्घकाळ संवाद बंद ठेवणे हा भावनिक अत्याचाराचा प्रकार ठरू शकतो आणि त्याचा संपूर्ण कुटुंबावर गंभीर मानसिक परिणाम होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT