लंडन : जगात एक असा देश आहे जिथे लिंग गुणोत्तराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात बिघडले आहे. या असंतुलनाचा थेट परिणाम तेथील महिलांच्या दैनंदिन आयुष्यावर होत आहे. घरातील दुरुस्तीची आणि तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, येथील महिलांना आता तात्पुरत्या स्वरूपात ‘पती’ किंवा ‘हँडीमॅन’ भाड्याने घेण्याची वेळ आली आहे. ‘द न्यूयॉर्क पोस्ट’च्या अहवालानुसार, बाल्टिक समुद्राच्या किनारी वसलेल्या ‘लाटव्हिया’ या युरोपियन देशात ही समस्या वाढत आहे.
युरोस्टॅटच्या आकडेवारीनुसार, लाटव्हियामध्ये पुरुषांपेक्षा 15.5 टक्के अधिक महिला आहेत. युरोपियन युनियनमधील सरासरी तफावतीपेक्षा ही दरी तीन पटीने जास्त आहे, ज्यामुळे हा देश सर्वाधिक लिंग असंतुलन असलेल्या देशांपैकी एक बनला आहे. विशेषतः ‘वर्ल्ड अॅटलस’ने नोंदवल्याप्रमाणे 65 वर्षांवरील लोकांमध्ये महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत दुप्पट आहे. पुरुषांची ही कमतरता लाटव्हियातील दैनंदिन जीवनात आणि कामाच्या ठिकाणी स्पष्टपणे जाणवते.
उत्सवांमध्ये काम करणार्या डॅनिया नावाच्या महिलेने सांगितले की, तिच्या टीममध्ये जवळपास सर्वच महिला आहेत. तिच्या मते, कामाच्या ठिकाणी चांगले संतुलन असल्यास सामाजिक संवाद अधिक चांगला आणि मनोरंजक होऊ शकतो. तिच्या मैत्रिणीने सांगितले की, चांगल्या जोडीदाराचे पर्याय कमी असल्यामुळे अनेक महिलांना साथीदार शोधण्यासाठी परदेशात जावे लागते. घरातील अनेक कामे, जसे की प्लंबिंग, सुतारकाम, दुरुस्ती किंवा टीव्ही इन्स्टॉलेशन यासारख्या गोष्टी पुरुष भागीदाराशिवाय पार पाडणे महिलांसाठी कठीण झाले आहे. त्यामुळेच लाटव्हियन महिला आता व्यावसायिक सेवांचा आधार घेत आहेत.
हे कामगार पडदे फिक्स करणे किंवा पेंटिंग करणे यांसारखी देखभालीची कामे जलद गतीने पूर्ण करतात. इतकंच नाही, तर काही सेवांमध्ये ‘एका तासासाठी नवरा’ ऑनलाईन किंवा फोनद्वारे बुक करता येतो. लाटव्हियातील या असंतुलनासाठी तज्ज्ञांनी अनेक कारणे दिली आहेत. त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे पुरुषांचे कमी आयुर्मान. धूम्रपानाचे उच्च प्रमाण आणि जीवनशैली संबंधित आरोग्याच्या समस्यांमुळे पुरुषांचे आयुर्मान कमी होते. ‘वर्ल्ड अॅटलस’नुसार, लाटव्हियन पुरुषांपैकी 31 टक्के पुरुष धूम्रपान करतात, तर महिलांमध्ये हे प्रमाण केवळ 10 टक्के आहे, तसेच अधिक पुरुष स्थूलता आणि वजनाच्या समस्यांनी ग्रस्त आहेत.