बीजिंग : चीनची तंत्रज्ञान कंपनी ‘उबटेक रोबोटिक्स’ (UBTECH Robotics) ने नुकताच एक व्हिडीओ जारी केला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. या व्हिडीओमध्ये शेकडो ह्युमनॉइड म्हणजेच मानवाकृती रोबो अगदी सैन्य शैलीत रांगेत चालताना दिसत आहेत. कंपनीचा दावा आहे की, त्यांच्या रोबो मॉडेलची ही पहिली मोठ्या प्रमाणावर डिलिव्हरी आहे.
हा व्हिडीओ ‘उबटेक रोबोटिक्स’ च्या दुसर्या पिढीच्या वॉकर एस2 (Walker S2) मॉडेलच्या लॉन्चचे प्रमोशन करण्यासाठी अत्यंत आकर्षक पद्धतीने शूट करण्यात आला आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, ‘उबटेक रोबोटिक्स’ चे म्हणणे आहे की, हा रोबो जगातील पहिला असा ह्युमनॉइड रोबो आहे जो स्वतःहून आपली बॅटरी बदलू शकतो. कंपनीने माहिती दिली आहे की या रोबोंची डिलिव्हरी नोव्हेंबरच्या मध्यापासून सुरू होईल. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया समोर आल्या. अनेक लोक रोबोंच्या अचूक चालीमुळे आश्चर्यचकित झाले.
काहींना हे द़ृश्य सायन्स-फिक्शन चित्रपटासारखे वाटले. काही यूजर्सनी व्हिडीओ एआय-जनरेटेड असल्याचा संशयही व्यक्त केला. तथापि, हा व्हिडीओ रोबोटिक्स कंपनी ‘उबटेक रोबोटिक्स’च्या फॅक्टरीमधीलच आहे, जिथे हे रोबो डिलिव्हरीसाठी सज्ज केले गेले आहेत. ‘उबटेक रोबोटिक्स’कंपनी या रोबोंचे मोठ्या स्तरावर उत्पादन करण्याची योजना आखत आहे. कंपनीने माहिती दिली की, त्यांना सिचुआन प्रांतातील जिगोंग शहरातील एका फर्मकडून 159 दशलक्ष युआन (सुमारे 22 दशलक्ष डॉलर्स) इतकी मोठी ऑर्डर मिळाली आहे. सप्टेंबरमध्ये मिळालेल्या 250 दशलक्ष युआन (सुमारे 34.5 दशलक्ष डॉलर्स) च्या मोठ्या करारानंतर हा त्यांचा दुसरा सर्वात मोठा करार आहे. याव्यतिरिक्त, कंपनीचे इतर अनेक सौदे निश्चित झाले आहेत.