हवाई : पौराणिक कथांमधील ‘इकारस’ने सूर्याच्या अतिशय जवळ उडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे मेणाचे पंख वितळून तो कोसळला. अगदी तशीच काहीशी अवस्था C/2025 K1 ( ATLAS) या धूमकेतूची झाली आहे. सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे या धूमकेतूचे तुकडे झाल्याचे हवाईमधील ‘जेमिनी नॉर्थ’ दुर्बिणीने टिपले आहे.
मे 2025 मध्ये ‘अॅटलस’ या प्रणालीद्वारे या धूमकेतूचा शोध लागला होता. 8 ऑक्टोबर 2025 रोजी हा धूमकेतू सूर्याच्या अत्यंत जवळून (सुमारे 5 कोटी किलोमीटर अंतरावरून) जाणार होता. सहसा, जेव्हा बर्फ आणि धुळीचा गोळा असलेले धूमकेतू सूर्याच्या जवळ जातात, तेव्हा त्यांच्यातील बर्फाचे वायूमध्ये रूपांतर होऊन ते अधिक प्रखरपणे चमकू लागतात. मात्र, ‘के1’ बाबत तसे घडले नाही. नोव्हेंबरच्या सुरुवातीला या धूमकेतूच्या केंद्रकाचे विघटन होऊ लागले. सूर्याची तीव— उष्णता आणि गुरुत्वाकर्षणामुळे धूमकेतूच्या अंतर्गत रचनेतून वायू आणि धुळीचे लोट बाहेर पडू लागले, ज्यामुळे त्याची संरचना कमकुवत झाली आणि अखेर त्याचे तुकडे झाले.
‘जेमिनी नॉर्थ’ने घेतलेल्या छायाचित्रात या धूमकेतूचे स्पष्टपणे तीन तुकडे झालेले दिसत आहेत. ‘के1’ धूमकेतूच्या विघटनानंतर आता खगोलशास्त्रज्ञांचे लक्ष C/2026 A1 ( MAPS) या नव्या धूमकेतूवर केंद्रित झाले आहे. 13 जानेवारी 2026 रोजी शोधण्यात आलेला हा धूमकेतू सध्या वेगाने सूर्याच्या दिशेने झेपावत आहे. 4 एप्रिल 2026 रोजी हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागापासून अवघ्या 7 लाख 48 हजार किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. जर हा नवा ‘ए1’ धूमकेतू सूर्याच्या प्रखर उष्णतेत टिकून राहिला, तर तो आकाशात शुक्राच्या ग्रहाइतका (Magnitude -4) तेजस्वी दिसू शकतो, असे भाकित खगोलशास्त्रज्ञांनी वर्तवले आहे. मात्र, ‘के1’प्रमाणेच यालाही सूर्याची धग आणि गुरुत्वाकर्षणाचा सामना करावा लागणार आहे. हा धूमकेतू तेजस्वीपणे चमकेल की सूर्याच्या आगीत भस्मसात होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.