Ancient Arctic humans | साडेचार हजार वर्षांपूर्वीही मानवाचे ‘आर्क्टिक’मध्ये पाऊल 
विश्वसंचार

Ancient Arctic humans | साडेचार हजार वर्षांपूर्वीही मानवाचे ‘आर्क्टिक’मध्ये पाऊल

नवीन संशोधनातून धक्कादायक खुलासे

पुढारी वृत्तसेवा

लंडन : साधारण 4,500 वर्षांपूर्वी ‘पॅलेओ-इनुईट’ जमातीच्या लोकांनी वायव्य ग्रीनलँडच्या किनारपट्टीपासून दूर असलेल्या अति आर्क्टिक (High Arctic) क्षेत्रातील बेटांवर वस्ती केली होती, असा दावा एका नवीन संशोधनात करण्यात आला आहे. सोमवारी (9 फेब—ुवारी) ‘अँटिक्विटी’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, या दुर्गम बेटांवर मानवी निवासाचे भक्कम पुरावे सापडले आहेत.

हे प्राचीन लोक प्रगत नौका तंत्रज्ञान आणि समुद्र पर्यटनात अत्यंत निष्णात होते. अत्यंत धोकादायक समुद्री मार्ग पार करून ते वारंवार या बेटांवर जात असत. समुद्री संसाधने आणि अन्नाच्या शोधात त्यांनी हा खडतर प्रवास केल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. ‘किटिस्सुट’ (ज्याला कॅरी बेटे म्हणूनही ओळखले जाते) हा ग्रीनलँडचा पश्चिमेकडील सर्वात दूरचा बिंदू आहे. हा सहा लहान बेटांचा समूह असून, तो ‘पॉलिन्हा’ नावाच्या समृद्ध समुद्री वातावरणात स्थित आहेत.

पॉलिन्हा म्हणजे बर्फाळ समुद्राच्या मधोमध असलेला पाण्याचा असा भाग, जो कायम उघडा (बर्फमुक्त) असतो. येथे मोठ्या प्रमाणात समुद्री पक्षी आणि त्यांची अंडी उपलब्ध असल्याने, पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी या बेटांचे सर्वेक्षण केले. संशोधनातील मुख्य निष्कर्ष : शास्त्रज्ञांना तीन बेटांच्या सर्वेक्षणात सुमारे 300 पुरातत्त्व अवशेष सापडले आहेत. ‘इजब्योर्न’ बेटाच्या टोकावर 15 घरांचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष म्हणजे दगडांनी बनवलेली वर्तुळे आहेत, ज्यांच्या मध्यभागी शेकोटी पेटवण्याची जागा होती. एका घरात सापडलेल्या प्राण्यांच्या हाडावरून असे सिद्ध झाले की, ही वस्ती 4,000 ते 4,475 वर्षांपूर्वीची आहे.

कॅलगरी विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ मॅथ्यू वॉल्स यांनी सांगितले की, ‘हे केवळ वार्‍याच्या प्रवाहामुळे भरकटलेले एखादे कुटुंब नव्हते, तर हे लोक जाणीवपूर्वक वारंवार येथे येत असत. ‘मुख्य भूमीपासून या बेटांचे अंतर किमान 53 किलोमीटर (33 मैल) आहे. हा प्रवास अत्यंत धोकादायक होता. कारण, या भागात सोसाट्याचा वारा, दाट धुके आणि समुद्राचे शक्तिशाली प्रवाह असतात. लाकडी सांगाडा आणि प्राण्यांच्या कातड्याने बनवलेल्या बोटींमधून हा प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे 12 तास लागत असावेत, असा संशोधकांचा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT