Unitree humanoid robots | चीनमध्ये ‘कुंग फू’ करणारे ह्युमनॉईड रोबो 
विश्वसंचार

Unitree humanoid robots | चीनमध्ये ‘कुंग फू’ करणारे ह्युमनॉईड रोबो

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : चीनच्या नवीन वर्षाच्या निमित्ताने आयोजित ‘2026 स्प्रिंग फेस्टिव्हल गाला’मध्ये तंत्रज्ञानाचा एक अद्भुत आविष्कार पाहायला मिळाला. जगातील पहिल्या पूर्णपणे स्वायत्त मार्शल आर्टस् प्रदर्शनात ह्युमनॉईड रोबोंनी (मानवासारखे दिसणारे यंत्रमानव) सहभाग घेत सर्वांना थक्क केले. या रोबोंनी ‘कुंग फू’ या मार्शल आर्टचे अफलातून सादरीकरण केले.

युनिट्री रोबोटिक्सच्या ‘जी1’ आणि ‘एच2’ या मॉडेल्सनी या कार्यक्रमात गुंतागुंतीची कसरतीची कामे आणि शस्त्रास्त्रांचा वापर करून चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. युनिट्रीच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, या सादरीकरणात रोबोंनी अनेक जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत: फ्रीस्टाईल टेबल-वॉल्टिंग पार्कर : सलगपणे टेबलवरून उड्या मारण्याचे कौशल्य पहिल्यांदाच रोबोंनी दाखवले. हवाई उडी : सुमारे 10 फूट (3 मीटर) उंचीपर्यंत झेप घेऊन हवेत कोलांटी उडी मारण्याचे यश संपादन केले. वॉल-असिस्टेड बॅकफ्लिप : भिंतीचा आधार घेऊन बॅकफ्लिप मारण्याचे तंत्रही त्यांनी यशस्वीपणे सादर केले.

गेल्या वर्षीच्या (2025) तुलनेत या रोबोंच्या हालचालींमध्ये मोठी सुधारणा दिसून आली. गेल्या वेळी हे रोबो काहीसे जड आणि अडखळत चालताना दिसत होते; मात्र यंदाच्या मॉडेल्समध्ये ‘डेक्स्ट्रेस हँडस्’ (अतिशय चपळ हात) बसवण्यात आले आहेत. यामुळे त्यांना वेगाने शरीराची स्थिती बदलणे, कसरतींमधील ताळमेळ राखणे आणि मार्शल आर्टस्ची शस्त्रे हाताळणे सहज शक्य झाले. कंपनीच्या मते, ही प्रगती आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), नवीन ङळवरी (लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग) प्रोसेसिंग आणि मेकॅनिकल सुधारणांमुळे शक्य झाली आहे.

हे ‘एम्बॉडीड एआय’ (Embodied AI) क्षेत्रातील एक मोठे पाऊल मानले जात आहे, जिथे शास्त्रज्ञ रोबोंना प्रत्यक्ष जगातील अडथळे समजून घेण्यास आणि नेव्हिगेट करण्यास सक्षम बनवत आहेत. ‘हे सादरीकरण पारंपरिक चिनी मार्शल आर्टस्चा सन्मान करण्यासाठी आयोजित केले होते. मार्शल आर्टस्चा आत्मा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मिलाफ घडवून आणणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे,’ असे युनिट्रीने आपल्या तांत्रिक ब्लॉगमध्ये म्हटले आहे. या प्रदर्शनासाठी कंपनीचे अभियंते नोव्हेंबर 2025 पासून तयारी करत होते. शास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणात डेटा वापरून एका ‘स्टंट-मोशन मॉडेल’ला प्रशिक्षित केले होते, ज्यामुळे रोबोंना सूक्ष्म आणि वेगवान हालचाली करणे सोपे झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT