मिलान : वस्तू उचलणे, धावणे आणि काही प्रमाणात खेळ खेळणे यांसारखी कामे ह्युमनॉईड रोबो आज सहज करू शकतात. पण, ते ड्रम किटच्या तालावर संगीत निर्माण करू शकतील का? एका नव्या संशोधनामुळे या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘रोबो ड्रमर’ नावाचा एक ह्युमनॉईड रोबो अवतार आता ‘अभिव्यक्त आणि अचूक ड्रमिंग’ करण्यास सक्षम आहे, असे इटलीतील पोलिटेक्निको दी मिलानो येथील शास्त्रज्ञांनी त्यांच्या नव्या अभ्यासात म्हटले आहे. हा अभ्यास प्रीप्रिंट अर्काइव्ह (ArXiv) या डेटाबेसवर अपलोड करण्यात आला आहे.
या प्रकल्पाची संकल्पना संशोधक असद अली शाहीद आणि लॉरिस रोवेडा यांना कॉफी पिताना झालेल्या एका अनौपचारिक गप्पेतून सुचली. ‘आम्ही चर्चा करत होतो की ह्युमनॉईड रोबो विविध प्रकारची कामे करण्यात तरबेज झाले आहेत, पण ते सर्जनशील आणि कलात्मक क्षेत्रात फारसे सक्रिय नाहीत, ‘असे शाहीद यांनी ‘टेक एक्सप्लोअर’ला सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘यामुळे एक रंजक प्रश्न निर्माण झाला : काय होईल जर एखादा ह्युमनॉईड रोबो संगीत सादर करण्यासारखी सर्जनशील भूमिका साकारू शकला? त्यासाठी ड्रमिंग हे एक उत्तम माध्यम वाटले, कारण त्यात लय, शारीरिक हालचाल आणि अवयवांमध्ये जलद समन्वयाची गरज असते.’
हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे की ‘रोबो ड्रमर’ हा सध्या प्रत्यक्षात अस्तित्वात असलेला रोबो नाही, तर ते एक सिम्युलेशन (Simulation) आहे. हे सिम्युलेशन भविष्यातील ह्युमनॉईड रोबोसाठी एक प्रणाली तयार करण्याच्या उद्देशाने ‘G1 युनिट्री’ (G1 Unitree) रोबोला मॉडेल म्हणून वापरते. या सिम्युलेशनमध्ये एक 3 D व्हिज्युअलाईज्ड G1 रोबोट रंग-कोडेड ड्रम किट वाजवताना दिसतो. यूट्यूबवर प्रकाशित केलेल्या एका व्हिडीओमध्ये, ‘रोबो ड्रमर’ दोन प्रसिद्ध गाण्यांच्या ड्रम बीटस्ची नक्कल करताना दाखवण्यात आला आहे. यातील आवाज मूळ गाण्यांपेक्षा थोडा वेगळा वाटतो, कदाचित तो ऐकण्यासाठी अधिक सोपा व्हावा, या उद्देशाने तसे केले असावे. लिंकिन पार्कच्या ‘इन द एंड’ या गाण्यावरील त्याची ड्रमिंग तालापासून थोडी भरकटलेली वाटते. ‘द पोलिस’ बँडच्या ‘रॉक्झॅन’ या गाण्यावरील त्याची कामगिरी मूळ संगीताशी अधिक जुळणारी आणि प्रभावी वाटते.