वॉशिंग्टन : माणसाचे शरीर बरेच अद्भुत असले तरी, जखमा बर्या होण्याच्या बाबतीत आपण इतर सस्तन प्राण्यांपेक्षा ‘स्लो कोच’ आहोत, असे एक नवीन संशोधन सुचवते. ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द रॉयल सोसायटी बी : बायोलॉजिकल सायन्सेस’ या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात असे आढळले की, माणसाच्या जखमा बर्या होण्यासाठी आपल्या सर्वात जवळच्या नातेवाईक प्रजाती असलेल्या चिंम्पांझी आणि बोनोबो यांच्या तुलनेत जवळपास तिप्पट वेळ लागतो.
संशोधकांच्या मते, ही संथ उपचार प्रक्रिया फक्त माणसांमध्येच दिसून आली आणि ती इतर प्रजातींसह प्राइमेटस्मध्ये किंवा उंदीरसारख्या इतर सस्तन प्राण्यांमध्ये आढळत नाही. त्यामुळे असा निष्कर्ष काढण्यात आला की, माणसांमध्ये जखमा बर्या होण्यात होणारा विलंब हा एक विशिष्ट उत्क्रांतीशील बदल असावा. माणसांमध्ये जखम भरून काढण्याची प्रक्रिया चार टप्प्यांत पार पडते. रक्त थांबवण्यासाठी गाठी पडणे (clotting), प्रतिजैविक पेशींचा (neutrophils, macrophages) प्रवेश, नवीन ऊतकांची निर्मिती किंवा कोलेजन तयार होणे, रक्तवाहिन्यांची वाढ, त्वचेच्या पेशी जखम झाकतात.
या प्रक्रिया अनेक सस्तन प्राण्यांमध्येही दिसतात. मात्र उंदीर, घोडे, मांजर अशा काही प्राण्यांमध्ये एक वेगळी प्रक्रिया असते, wound contraction म्हणजेच जखमेचे कडे एकमेकांकडे खेचले जातात, अगदी शिवणकामासारखे. या अभ्यासात मानवी व इतर सस्तन प्राण्यांमध्ये एकसारख्या जखमा दिल्या गेल्या आणि त्या बर्या होण्याचा वेग मोजण्यात आला. चिम्पांझीसारख्या जवळच्या प्रजाती जखमा भरून काढण्यात माणसांपेक्षा कितीतरी पुढे असल्याचे स्पष्ट झाले. या निष्कर्षावरून असं सुचवता येतं की, माणसांनी कधीतरी आपल्या उत्क्रांतीच्या प्रवासात हळू उपचार प्रक्रियेचा स्वीकार केला असावा, कदाचित दीर्घ आयुष्य, जास्त सुरक्षित जीवनशैली किंवा वेगळ्या जैविक गरजांमुळे.