जयपूर : पुस्तकाचे अख्खे पान असो, अंकांची लांबलचक साखळी असो किंवा हजारो वर्षांपूर्वीचे कॅलेंडर; केवळ एकदा पाहून किंवा ऐकून ते शब्दशः सांगणे कोणत्याही सामान्य माणसासाठी अशक्य आहे. मात्र, राजस्थानच्या बारां जिल्ह्यातील मोहित गुप्ता यांनी हे शक्य करून दाखवले आहे. सोशल मीडियावर ‘मेमरी डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध असलेले मोहित आपल्या अचाट स्मरणशक्तीमुळे सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरले आहेत.
मोहित यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची ‘फोटोग्राफिक’ आणि ‘ऑडिटरी’ मेमरी. ते कोणतीही माहिती एकदा वाचली किंवा ऐकली की ती जशीच्या तशी क्रमाने सांगू शकतात. शंभर अंकांची मालिका असो किंवा संख्यांचे ‘क्यूब्स’ (घण), त्यांची अचूकता पाहून लोक त्यांना ‘सुपर कॉम्प्युटर’ची उपमा देत आहेत. मोहित यांच्या या प्रवासाची सुरुवात कोरोना लॉकडाऊनच्या काळात झाली. फावल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी त्यांनी मेमरी मॅपिंग, पॅटर्न रिकग्निशन आणि माईंड पॅलेस यांसारख्या प्रगत मेमरी तंत्रांचा सराव सुरू केला.
दररोज अनेक तासांचा सराव, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी आपली स्मरणशक्ती या उच्च शिखरावर नेऊन ठेवली आहे. मोहित यांचे थक्क करणारे विक्रम : 10,000 वर्षांचे कॅलेंडर : मोहित यांना 10,000 वर्षांच्या कॅलेंडरमधील कोणत्याही तारखेचा वार तोंडपाठ आहे. संख्यांचा खेळ : 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचे ‘क्यूब्स’ त्यांनी काही क्षणांत स्मरणात ठेवले आहेत. उलटा-सुलटा क्रम : शेकडो अंक एकदा ऐकून ते सरळ आणि उलट्या क्रमाने अचूकपणे सांगू शकतात.
विक्रमांची नोंद : त्यांच्या या कामगिरीची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’, ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ आणि ‘इन्फ्लुएंसर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये करण्यात आली आहे. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये बोलताना मोहित यांनी सांगितले की, ‘स्मरणशक्ती हा कोणताही जन्मजात चमत्कार नाही. योग्य तंत्र, नियमित सराव आणि संयम ठेवला, तर कोणीही आपली स्मरणशक्ती कित्येक पटीने वाढवू शकतो.’ सध्या मोहित सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या तरुणांना स्मरणशक्ती वाढवण्याचे तंत्र शिकवत आहेत. राजस्थानच्या एका छोट्या जिल्ह्यातून येऊन जागतिक स्तरावर ठसा उमटवणारे मोहित गुप्ता आज हजारो तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.