Ancient Egypt | इजिप्तमध्‍ये राजांच्या मृत्यूनंतर सेवकांचा दिला जायचा नरबळी! 
विश्वसंचार

Ancient Egypt | इजिप्तमध्‍ये राजांच्या मृत्यूनंतर सेवकांचा दिला जायचा नरबळी!

५,००० वर्षे जुन्या कवट्यांमधून उलगडले धक्कादायक गुपित

पुढारी वृत्तसेवा

कैरो : प्राचीन इजिप्तच्या पहिल्या राजघराण्यातील राजांच्या थडग्यांभोवती आढळलेल्या ५,००० वर्षे जुन्या सांगाड्यांचे गूढ अखेर आधुनिक न्यायवैद्यक (फॉर्रेन्‍सिक) विज्ञानाने उलगडले आहे. मृत्यूनंतरच्या जगातही राजाची सेवा करता यावी, यासाठी राजाच्या निधनानंतर त्यांच्या राजवाड्यातील सेवक आणि कारागिरांचा बळी (रिटेनर सॅक्रिफाईस) दिला जात होता. या शतकापूर्वीच्या सिद्धांताला या शोधामुळे भक्कम पुष्टी मिळाली आहे.

सुमारे इसवी सन पूर्व ३००० मध्ये इजिप्तच्या सुरुवातीच्या राजांनी अ‍ॅबिडोस येथे भव्य थडगी बांधली होती. या मुख्य थडग्यांभोवती रांगांमध्ये शेकडो लहान कबरी आढळल्या होत्या. १९२० च्या दशकात प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ फ्लिंडर्स पेट्री यांनी या कबरींचे उत्खनन केले तेव्हा त्यांना राजांसोबत एवढ्या मोठ्या संख्येने लोक का पुरले गेले, याचा संशय आला होता. या कबरींमध्ये कनिष्ठ व मध्यम दर्जाचे अधिकारी आणि कारागीर होते.

पर्ड्यू युनिव्हर्सिटीच्या डॉ. रोझेलिन कॅम्पबेल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे संशोधन केले आहे. पेट्री यांनी काही निवडक कवट्या केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या ‘डकवर्थ कलेक्शन’मध्ये जतन केल्या होत्या. डॉ. कॅम्पबेल यांनी यातील ४६ कवट्यांची फॉरेन्सिक तपासणी केली असता, १८ कवट्यांवर मृत्यूच्या वेळीच डोक्यावर झालेल्या आघातांचे आणि फ्रॅक्चरचे पुरावे आढळले.

डॉ. कॅम्पबेल यांच्या मते, राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या जवळच्या सेवकांना ठार मारण्याची ही प्रथा केवळ मृत्यूनंतरच्या जगात सेवा मिळवण्यासाठीच नव्हे, तर राजाची अफाट शक्ती आणि दरारा दाखवण्यासाठीही पाळली जात असावी. उर्वरित लोकांचा मृत्यू नैसर्गिक होता की श्वास गुदमरून त्यांची हत्या झाली, हे संपूर्ण सांगाडे उपलब्ध नसल्याने अद्याप अस्पष्ट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT