Human Sacrifice in Ancient Egypt | प्राचीन इजिप्तमध्ये राजाच्या मृत्यूनंतर सेवकांचा नरबळी 
विश्वसंचार

Human Sacrifice in Ancient Egypt | प्राचीन इजिप्तमध्ये राजाच्या मृत्यूनंतर सेवकांचा नरबळी

पुढारी वृत्तसेवा

कैरो : प्राचीन इजिप्तमधील राजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सेवकांचा नरबळी दिला जात असल्याचा संशय शास्त्रज्ञांना कित्येक दशकांपासून होता. आता एका नव्या फॉरेन्सिक संशोधनाने या गृहितकाला थेट वैज्ञानिक पुरावा दिला आहे. अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठाच्या संशोधक रोझलिन ए. कॅम्पबेल यांनी केलेल्या अभ्यासात राजांच्या कबरींलगत पुरलेल्या सेवकांच्या कवटींवर प्राणघातक जखमांचे पुरावे सापडले आहेत.

१९२० च्या दशकात ब्रिटीश पुरातत्त्‍वशास्त्रज्ञ फ्लिंडर्स पेट्री यांनी पूर्व इजिप्तमधील ‘अबिडोस’ येथील सुमारे इसवी सन पूर्व ३००० काळातील शाही कबरींचे उत्खनन केले होते. त्यावेळी सापडलेल्या अवशेषांपैकी केंब्रिज विद्यापीठात जतन करून ठेवलेल्या ४६ कवट्यांचे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे फॉरेन्सिक विश्लेषण करण्यात आले. त्यापैकी १८ कवट्यांवर (सुमारे ३९ टक्‍के) सरळ रेषेतील फ्रॅक्चर आढळले. हे फ्रॅक्चर सपाट व रुंद शस्त्राच्या जोरदार प्रहाराने झाल्याचे स्पष्ट झाले असून, यामुळे तातडीने अंतर्गत रक्तस्राव होऊन संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असावा.

सत्तेचे भीषण प्रदर्शन

प्राचीन इजिप्तमधील समजुतींनुसार, मृत्यूनंतरच्या जीवनात राजाची सेवा सुरू ठेवण्यासाठी किंवा स्वतःच्या अफाट सत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी राजे सेवकांचा नरबळी देत असावेत. काही सेवकांनी अमरत्व किंवा सन्मान मिळवण्यासाठी स्वेच्छेने मृत्यू पत्करला असावा, तर काहींना बळजबरीने मारण्यात आले असावे, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे; मात्र उपलब्ध मर्यादित नमुन्यांमुळे सर्वच सेवकांचा बळी दिला गेला होता की काहींचा नैसर्गिक मृत्यू झाला, हे निश्चित सांगता येत नाही, असेही कॅम्पबेल यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT