नवी दिल्ली : उत्तराखंडचा राज्यपक्षी असलेला ‘हिमालयन मोनल’ हा संपूर्ण हिमालयीन पर्वतरांगांमध्ये, जसे की जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीममध्ये आढळणारा एक अत्यंत देखणा आणि आकर्षक पक्षी आहे. हा मोरासारखे चमकदार निळे-हिरवे रंग व डोक्यावर तुरा असणारा पक्षी जमिनीवर वावरणारा असून सध्या तो धोक्यात आलेल्या प्रजातींमध्ये मोडत नसला, तरी ‘हेमवती नंदन बहुगुणा गढवाल विद्यापीठा’च्या संशोधकांनी केलेल्या दोन अभ्यासांमधून त्याच्या अस्तित्वाला निर्माण झालेल्या मोठ्या धोक्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. मानवामुळे त्याच्या आवाजाची वारंवारता बदलत असल्याचे आता दिसून आले आहे.
विद्यापीठातील संशोधक राजीव लोचन, दिनेशकुमार शर्मा आणि आनंद कुमार यांनी ५ वर्षांहून अधिक काळ अभ्यास करून हे निष्कर्ष काढले आहेत. यातील एका अभ्यासात आगामी दशकांमध्ये हवामान बदलामुळे या पक्ष्याच्या नैसर्गिक अधिवासावर कसा परिणाम होऊ शकतो, हे पाहण्यात आले आहे. तर दुसऱ्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, पर्यटन आणि वाहनांच्या गोंगाटामुळे हा पक्षी आपल्या आवाजाची वारंवारता बदलत आहे. संशोधकांनी अद्याप याचे पूर्ण पुरावे सिद्ध केले नसले, तरी या बदलाचा त्यांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
आवाजाच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी ‘केदारनाथ कस्तुरी मृग अभयारण्या’तील दोन भागांची तुलना केली, पहिला ‘मदमहेश्वर दरी’, जिथे मानवी हस्तक्षेप खूपच कमी आहे आणि दुसरा ‘चोपटा दरी’, जिथे रस्ते, पर्यटक, भाविक आणि वाहनांची मोठी रहदारी असते. संशोधकांनी दोन्ही भागांतील मोनल पक्ष्यांच्या शेकडो हाका (आवाज) रेकॉर्ड करून त्यांची तुलना केली. या अभ्यासातून अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर आली ती म्हणजे, जास्त गोंगाट असलेल्या चोपटा दरीत राहणारे मोनल पक्षी अधिक उच्च वारंवारतेच्या आवाजात ओरडत होते. ‘‘मदमहेश्वर दरीमध्ये रस्ता नसल्यामुळे तेथील परिसर तुलनेने शांत आणि सुरक्षित आहे.
या उलट चोपटा भागात रस्ता आहे आणि तेथे तीर्थयात्रा व पर्यटनामुळे मोठ्या प्रमाणावर लोक येतात. आम्ही या पक्ष्याच्या व्हॉकल बिहेव्हियरवर (आवाजाच्या वर्तनावर) काम करत होतो, तेव्हा आमच्या लक्षात आले की चोपटामधील मोनल पक्षी अधिक फ्रिक्वेन्सी आणि अॅम्प्लिट्यूडने (मोठ्या आवाजात) हाक मारतात. मदमहेश्वर दरीत हे प्रमाण खूप कमी होते. याचे मुख्य कारण म्हणजे वाहतूक आणि पर्यटनामुळे होणारा मानवनिर्मित गोंगाट आहे,’’ अशी माहिती या अभ्यासाचे सहलेखक आणि HBGU च्या प्राणिशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक आनंद कुमार यांनी दिली.