वॉशिंग्टन : पृथ्वीपासून 320 प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या तार्याभोवती फिरणार्या मोठ्या ग्रहाचा शोध वैज्ञानिकांनी लावला असून, त्याची घनता स्टायरोफोमइतकी आहे. हा ग्रह फुगलेला असून, त्याचा फायदा जीवसृष्टी असणार्या ग्रहांचा अंदाज घेण्यासाठी करता येणार आहे, त्यासाठी तेथील वातावरणाच्या चाचण्या घ्याव्या लागतील. हा ग्रह फुगलेला असून, त्याचे वस्तुमान गुरूच्या एक पंचमांश आहे; पण तो 40 टक्के मोठा आहे. त्याचे वातावरण विस्तृत आहे, असे अमेरिकेतील लेहीग विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक जोशुआ पेप्पर यांनी सांगितले.
स्टायरोफोम हे फुगवलेले पॉलिस्टायरिन असते व ते अन्नाचे कंटेनर तयार करण्यासाठी वापरले जाते. या ग्रहाचा मातृतारा चमकदार असून, त्यामुळे या ग्रहाच्या वातावरणाचे मापन सहज शक्य आहे. इतर ग्रहांच्या वातावरणाच्या मापनासाठी हा ग्रह म्हणजे एक सराव प्रयोगशाळा ठरणार आहे. या ग्रहाचे नाव केईएलटी 11 बी असे असून, तो तार्याभोवतीच अगदी जवळच्या कक्षेतून फिरत आहे. या कक्षेत फिरण्यास त्याला पाच दिवस लागतात. केईएलटी 11 हा तारा अणुइंधन वापरत असून, त्याचे रूपांतर लाल मोठ्या ग्रहात होत आहे. त्यानंतर तो ग्रह तार्याने वेढला जाईल व पुढील शेकडो दशलक्ष वर्षांत तो तग धरू शकणार नाही.