वॉशिंग्टन : ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडण्याच्या दिशेने खगोलशास्त्रज्ञांनी एक मोठे पाऊल टाकले आहे. हबल स्पेस टेलिस्कोपचा वापर करून शास्त्रज्ञांनी ‘क्लाऊड-9’ नावाच्या एका नवीन प्रकारच्या खगोलीय वस्तूचा शोध लावला आहे. हा वायूंनी भरलेला आणि डार्क मॅटरचा असा ढग आहे, ज्यामध्ये एकही तारा नाही. हा ढग एका संपूर्ण आकाशगंगेत रूपांतरित होण्यासाठी आवश्यक असलेल्या वजनापेक्षा किंचित हलका राहिल्याने त्याचे रूपांतर आकाशगंगेत होऊ शकले नाही.
‘द अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, ही विचित्र वस्तू पृथ्वीपासून 1.4 कोटी प्रकाशवर्षे दूर, ‘मेसियर 94’ नावाच्या सर्पिल आकाशगंगेजवळ स्थित आहे. शास्त्रज्ञांच्या मते, ‘क्लाऊड-9’ हा विश्वाच्या सुरुवातीच्या काळातील एक अवशेष आहे. गॅस आणि डार्क मॅटरच्या ढगाला आकाशगंगेचे स्वरूप येण्यासाठी नेमक्या किती वस्तुमानाची गरज असते, हे या शोधामुळे स्पष्ट झाले आहे. हा शोध ‘लॅम्बडा कोल्ड डार्क मॅटर’ या विश्वाच्या संरचनेचे स्पष्टीकरण देणार्या मुख्य सिद्धांताला बळकटी देतो.
या सिद्धांतानुसार, डार्क मॅटरचे असे अनेक ‘हेलो’ अवकाशात विखुरलेले असावेत, जे आकाशगंगांना आधार देतात. स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक दीप आनंद यांनी सांगितले की, असे अनेक डार्क हॅलो अस्तित्वात असावेत. परंतु त्यापैकी बहुतेकांमध्ये हायड्रोजन वायू नसल्यामुळे ते अदृश्य राहतात. क्लाऊड-9 हा अशा डार्क हॅलोच्या श्रेणीत येतो, ज्याचे वस्तुमान पुरेसे आहे, ज्यामुळे त्याने स्वतःमधील वायू टिकवून ठेवला आहे आणि म्हणूनच रेडिओ निरीक्षणातून तो पाहणे शक्य झाले आहे.
तीन वर्षांपूर्वी चीनमधील ‘फास्ट’ या जगातील सर्वात मोठ्या रेडिओ टेलिस्कोपद्वारे याचा शोध लागला होता. न्यू मेक्सिकोमधील ‘व्हेरी लार्ज अॅरे’द्वारे यावर अधिक संशोधन करण्यात आले. परंतु जमिनीवरील दुर्बिणींच्या मर्यादेमुळे त्याचे नेमके स्वरूप स्पष्ट होऊ शकले नव्हते. शेवटी हबल स्पेस टेलिस्कोपच्या मदतीने हे स्पष्ट झाले की, ही एखादी अस्पष्ट वामन आकाशगंगा नसून, तार्यांशिवाय असलेला डार्क मॅटरचा ढग आहे. या शोधामुळे आता शास्त्रज्ञांना अशी आशा आहे की, अवकाशात असे अनेक तार्यांशिवाय असलेले डार्क मॅटरचे ढग असू शकतात, जे विश्वाच्या रचनेचे गुपित उलगडण्यास मदत करतील.