नवी दिल्ली : नुकतेच भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचून एक नवा इतिहास रचला. या मोहिमेचा भाग झाल्यानंतर त्यांनी थेट अंतराळातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. या विशेष क्षणानंतर, लोकांच्या मनात पुन्हा एकदा हा प्रश्न निर्माण झाला आहे की, इतक्या दूर, कोणतेही मोबाईल नेटवर्क किंवा इंटरनेट नसताना, अंतराळवीर पृथ्वीवरील व्यक्तीला व्हिडीओ कॉल कसा करू शकतात? यामागील वैज्ञानिक माहिती जाणून घेऊया...
अंतराळात हवा नसल्यामुळे तिथे निर्वात पोकळी (Vacuum) असते. याच कारणामुळे तिथे कोणतेही मोबाईल नेटवर्क काम करू शकत नाही. तसेच, इंटरनेटसाठी आवश्यक असलेल्या तारा किंवा वाय-फायसारखी कोणतीही सामान्य सुविधा तिथे उपलब्ध नसते. असे असूनही, शास्त्रज्ञ पृथ्वीशी सतत संपर्कात राहतात. हा चमत्कार केवळ विज्ञान आणि उच्च तंत्रज्ञानामुळे शक्य झाला आहे. नासाची ‘स्पेस कम्युनिकेशन अँड नेव्हिगेशन सिस्टीम’ (Space Communications and Navigation - SCaN) ही या संपूर्ण प्रक्रियेचा आधार आहे.
ही प्रणाली ट्रान्समिशन, रिले आणि रिसेप्शन या तीन टप्प्यांत काम करते. संदेश प्रथम एका विशिष्ट कोडमध्ये बदलून प्रसारित (Transmit) केला जातो, त्यानंतर तो नेटवर्कद्वारे रिसीव्हरपर्यंत पोहोचतो आणि शेवटी डीकोड होऊन ऑडिओ किंवा व्हिडीओ स्वरूपात बदलतो.अंतराळ स्थानक आणि पृथ्वी यांच्यात संपर्क कायम ठेवण्यासाठी नासाने जगभरातील सातही खंडांवर प्रचंड मोठे अँटेना बसवले आहेत. त्यांची लांबी सुमारे 230 फूट आहे. इतका मोठा आकार आणि उच्च-फ्रिक्वेन्सीमुळे, ही उपकरणे तब्बल 200 कोटी मैलांपर्यंत सिग्नल पाठवण्यास आणि स्वीकारण्यास सक्षम आहेत.
सध्या नासा अंतराळातून संवाद साधण्यासाठी रेडिओ लहरींचा वापर करते;परंतु भविष्याचा वेध घेत, एजन्सी आता लेझर-आधारित इन्फ्रारेड तंत्रज्ञानावर काम करत आहे, ज्यामुळे डेटा ट्रान्समिशन आणखी वेगवान आणि अचूक होईल. नासाकडे असे अनेक रिले सॅटेलाईटस् आहेत जे अंतराळ स्थानक आणि जमिनीवरील स्टेशन यांच्यात सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करतात. हे उपग्रह संदेशांना मध्येच पकडून (Intercept) पुढे पाठवतात, ज्यामुळे थेट संपर्क कायम राहतो.