मुंबई : समुद्रकिनारा सर्वांनाच आवडतो आणि भारतातील अनेक समुद्रकिनार्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी असते. समुद्राच्या लाटा जितक्या आकर्षक असतात, त्यापेक्षा अधिक त्या धोकादायक असू शकतात. आपण सहसा डोंगर कापून बोगदे बनवताना पाहिले असतील; पण समुद्राखाली देखील बोगदे तयार केले जातात हे फार कमी लोकांना माहीत आहे. समुद्राखाली बोगदे कसे तयार केले जातात, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
मीडिया रिपोर्टस्नुसार, भारतातील पहिला समुद्री बोगदा महाराष्ट्रातील मुंबई शहरात तयार करण्यात आला आहे. या बोगद्याची एकूण लांबी 2.07 किलोमीटर आहे. समुद्राखाली बोगदे तयार करण्यासाठी सामान्यतः ‘कट-अँड-कव्हर’ पद्धतीचा वापर केला जातो. ही पद्धत वापरताना, सर्वप्रथम तंत्रज्ञ समुद्राच्या खोलीत एक खंदक खोदतात. यानंतर, आधीपासून तयार केलेले सिमेंट-काँक्रीटचे किंवा स्टीलचे ट्यूब या खंदकात टाकले जातात. मग या ट्यूब्सना दगडांच्या मदतीने झाकले (कव्हर केले) जाते. यानंतर हळूहळू या ट्यूब्सची जोडणी केली जाते.
जोडणी पूर्ण झाल्यावर, बोगद्यातील उरलेले पाणी बाहेर पंप केले जाते. समुद्राखाली बोगदे बनवण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. 1921 मध्ये लंडनमध्ये जगातील पहिली पाण्याखालील रेल्वे लाईन तयार करण्यात आली होती. भारतात पहिला समुद्री बोगदा बनवण्याचा प्रस्ताव 1967 च्या मुंबई विकास योजनेत ठेवण्यात आला होता; परंतु तो पूर्ण होण्यास अनेक वर्षे लागली आणि आता तो तयार झाला आहे. रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हे बोगदे तयार केले जातात. बोगदे तयार केल्यामुळे वादळ, धुके यांसारख्या हवामानातील बदलांचा प्रवासावर परिणाम होत नाही. याशिवाय, हे बोगदे गुप्त वाहतुकीचे एक साधनदेखील असू शकतात, जे समुद्री जहाजांना वरून दिसत नाहीत.