वॉशिंग्टन : वाढत्या वयानुसार मेंदूची कार्यक्षमता टिकवून ठेवणे आणि विस्मरणासारखे आजार (डिमेंशिया) टाळणे आता आपल्या हातात आहे. 'अल्झायमर्स असोसिएशन'ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात मेंदूच्या आरोग्यासाठी दररोजच्या जीवनशैलीत १० महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. मेंदूसाठी ही सवय म्हणजे एका 'बचत खात्या'सारखी (Cognitive Reserve) आहे, ज्याचा फायदा भविष्यात होतो.
१. मेंदूला आव्हाने द्या : दररोज काहीतरी नवीन शिका. नवीन भाषा, एखादे कठीण कौशल्य किंवा बुद्धिबळासारखे धोरणात्मक खेळ खेळल्याने मेंदू सक्रिय राहतो.
२. शिकत राहा : शिक्षणामुळे स्मृतिभ्रंशाचा धोका कमी होतो. स्थानिक वाचनालयात जा, एखादा ऑनलाईन क्लास लावा किंवा नवीन विषयावर वाचन करा.
३. नियमित व्यायाम : आठवड्यातून किमान ४ वेळा ३० ते ३५ मिनिटे वेगाने चालणे, धावणे किंवा डान्स करणे यासारखे व्यायाम करा. यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा सुधारतो.
४. डोक्याची सुरक्षा : सायकल चालवताना किंवा खेळ खेळताना हेल्मेट वापरा आणि प्रवासात सीटबेल्ट लावा. डोक्याला लागलेली गंभीर दुखापत भविष्यात मेंदूच्या आरोग्यावर परिणाम करू शकते.
५. धूम्रपान सोडा : धूम्रपान सोडल्यास काही काळानंतर विस्मरणाचा धोका, कधीही धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींइतकाच कमी होतो.
६. रक्तदाब नियंत्रित ठेवा : उच्च रक्तदाबाचा थेट परिणाम मेंदूच्या नसांवर होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तदाब नेहमी सामान्य मर्यादेत ठेवा.
७. मधुमेहाचे व्यवस्थापन : टाईप-२ मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य आहार आणि औषधोपचार घ्या.
८. पौष्टिक आहार : आहारात हिरव्या पालेभाज्या, कमी चरबीयुक्त प्रथिने आणि कमीत कमी प्रक्रिया केलेले (Less Processed) पदार्थ यांचा समावेश करा.
९. वजनावर नियंत्रण : लठ्ठपणामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवतात, ज्यांचा परिणाम मेंदूवर होतो. त्यामुळे निरोगी वजन राखण्याचा प्रयत्न करा.
१०. पुरेशी झोप : दिवसाला किमान ७ तासांची शांत झोप घ्या. झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा टी.व्ही.चा वापर टाळा, जेणेकरून मेंदूला पूर्ण विश्रांती मिळेल.