फ्रँकफर्ट : रक्तात असणारी कला माणसाला स्वस्थ बसू देत नाही. याच अट्टाहासातून कर्नाटकातील पारंपरिक कला यक्षगान आया युरोपामध्ये डंका वाजवत आहे. याला कारणीभूत ठरतेय ती अपूर्व बेलेयूर यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘यक्षमित्रारू जर्मनी’ ही संस्था. त्यातूनच सुरू झाला चिकाटी, सांस्कृतिक अभिमान आणि कलात्मक उत्कृष्टतेने नटलेला या ताफ्याचा प्रवास. परदेशात स्थायिक झालेल्या काही भारतीयांनी आपली परंपरा कशी जिवंत ठेवली आहे, याचे हे एक उत्तम उदाहरण. अपूर्व यांचे यक्षगानशी असलेले नाते खूप जुने आणि घट्ट आहे. ते प्रसिद्ध कलाकार बेलेयुरू कृष्णमूर्ती यांचे सुपुत्र आहेत, त्यांनी 28 वर्षे सालिग्राम यक्षगान मंडळीत काम केले होते. असा भक्कम वारसा असूनही, कलाकाराच्या जीवनातील संघर्ष पाहून त्यांच्या वडिलांनी सुरुवातीला अपूर्व यांना दुसर्या करिअरमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.
2015 मध्ये जर्मनीला गेल्यानंतर, अपूर्व यांच्या लक्षात आले की, त्यांचे यक्षगानशी असलेले नाते इतके खोल आहे की त्याकडे दुर्लक्ष करणे अशक्य आहे. ही कला नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या इच्छेने त्यांनी आपले मित्र अजित प्रभू यांच्याशी एक गट सुरू करण्याबाबत चर्चा केली. त्यातून यक्षमित्रारू जर्मनीचा जन्म झाला. आज या संघात पाच समर्पित सदस्य आहेत अपूर्व, शशिधर नायरी, श्री हरी होसमने, प्रतीक हेगडे बेंगळे आणि सुषमा रवींद्र. हे सर्वजण बँका आणि ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये नोकरी करत असूनही आपली कला जोपासण्यासाठी वेळ काढतात. त्यांनी जर्मनी, फ्रान्स, स्वीडन, नेदरलँडस्, स्वित्झर्लंड, पोलंड, स्पेन आणि डेन्मार्क अशा 8 देशांतील 25 शहरांमध्ये सादरीकरण केले आहे.
ते कर्नाटकातील कारकला येथील संजय बेलेयूर आणि शशिकांत शेट्टी यांच्या मदतीने भारतातून सर्व पारंपरिक वेशभूषा आणि दागिने मागवतात. स्वीडनमधील एका विद्यार्थ्याने यक्षमित्रारू जर्मनीवर सखोल संशोधन केले आहे, जे उपसाला विद्यापीठाने प्रकाशित केले आहे. जर्मनीतील आणखी एक विद्यार्थी या गटावर लक्ष केंद्रित करून पीएच.डी. करत आहे आणि 2026 मध्ये इटालियन, स्पॅनिश, फ्रेंच, डच आणि जर्मन भाषांमध्ये यावर एक माहितीपट प्रदर्शित होणार आहे. 2024 पासून यक्षमित्रारू जर्मनी जर्मन थिएटरमध्ये यक्ष संक्रांती हा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत आहे. हा कार्यक्रम अशा भारतीय कलाकारांवर प्रकाश टाकतो ज्यांनी पारंपरिक कला प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.