पृथ्वीच्या सर्वात जवळचा चंद्र नेमका किती वर्षांचा? Pudhari File Photo
विश्वसंचार

पृथ्वीच्या सर्वात जवळचा चंद्र नेमका किती वर्षांचा?

चंद्राची निर्मिती 4.53 अब्ज वर्षांपूर्वी झाली होती

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : अवकाशातली अनेक रहस्ये आजही उलगडलेली नाहीत. त्यावर अजूनही संशोधन सुरू आहे. चंद्र कदाचित 10 कोटी वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त जुना असावा, असा संशोधकांचा समज होता; पण ‘नेचर’ नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामुळे या जुन्या समजाला आव्हान दिले गेले आहे. सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळात मंगळाच्या आकाराचा एक ग्रह पृथ्वीवर आदळला. त्यामुळे चंद्र हा आपला नैसर्गिक उपग्रह तयार झाला, असे आतापर्यंत मानले जात होते. ही घटना सुमारे 4.35 अब्ज वर्षांपूर्वी घडल्याचे मानले जाते. तथापि, चंद्राची निर्मिती 4.53 अब्ज वर्षांपूर्वी झाली होती, असे अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनीच्या संशोधकांनी संयुक्तपणे केलेला अभ्यास सांगतो.

जर नवीन अभ्यासाचा दावा खरा मानला तर चंद्राशी संबंधित अनेक गूढ गोष्टींची उत्तरे मिळू शकतात. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सांताक्रूजच्या भूगर्भशास्त्रज्ञ फ्रान्सिस निम्मो यांच्या नेतृत्वाखाली काम करणार्‍या पथकाने म्हटले आहे की, या शोधामुळे आपल्या ग्रहाचा इतिहास आणि उत्क्रांती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. चंद्राच्या निर्मितीबाबत सध्या शास्त्रज्ञांमध्ये जो समज आहे, त्यानुसार सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळातल्या घडामोडीतून त्याची निर्मिती झाली असेल, असा अंदाज आहे. सुमारे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी सूर्याची निर्मिती झाली. त्या वेळी आपल्या तार्‍याभोवती वायू आणि धुळीचे आवरण होते. हे आवरण खडकांच्या स्वरूपात होते आणि ते एकमेकांना चिकटले होते. ते एकमेकांवर आदळून विस्कळीत झाले.

ज्या झिरकॉन क्रिस्टलमुळे ही माहिती समोर आली ते कोणत्याही नमुन्याचे वय ठरवण्याचा उत्तम मार्ग आहे, कारण ते ज्या पद्धतीने तयार होतात, ती थोडी विचित्र असते. चंद्रावर सापडलेल्या झिरकॉन क्रिस्टलचे नमुने 4.35 अब्ज वर्षांपेक्षा जास्त आकडा दर्शवतात. हा आकडा व्यापक सिद्धांताच्या विरुद्ध आहे. हे कसे शक्य आहे ते शोधण्यासाठी निम्मो आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मॉडेलिंगचा वापर केल्यावर दोन्ही गोष्टी सत्य असू शकतात, असे विश्लेषण केले. त्यानुसार चंद्राची निर्मिती पहिल्यांदा झाली असेल आणि त्यानंतर 4.35 अब्ज वर्षांपूर्वी त्याचे आवरण वितळले असेल. चंद्राचे वय 4.43 ते 4.53 अब्ज वर्षांदरम्यान असल्याचे हे संशोधन सांगते. पृथ्वीचे वय अंदाजे 4.54 अब्ज वर्षं आहे. म्हणजेच चंद्र पहिल्यापासूनच पृथ्वीसोबत आहे, असा याचा अर्थ होतो, असे यात म्हटले गेले आहे.

कशी झाली चंद्राची निर्मिती?

संशोधकांच्या मते, मंगळाच्या आकाराचा एक मोठा ग्रह नवजात पृथ्वीवर आदळला आणि चंद्राची निर्मिती झाली. निर्मितीच्या वेळी तो उष्ण आणि चिकट होता. पृथ्वीचा एक मोठा भाग कक्षेत फेकला गेला असावा. तिथं ते एकत्र झाल्याने चंद्राची निर्मिती झाली असावी. चंद्राच्या निर्मितीनंतर तिथं मॅग्माचा महासागर होता. तो वेगाने थंड झाला आणि त्याचं रूपांतर कठीण पृष्ठभागात झाले. चंद्रावर आढळलेल्या झिरकॉन खनिज क्रिस्टलमुळे ही नवीन माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT