शरीराला किती प्रोटिन्सची गरज असते? Pudhari File Photo
विश्वसंचार

शरीराला किती प्रोटिन्सची गरज असते?

शाकाहारातून ते किती मिळतात हे पाहणेही गरजेचे

पुढारी वृत्तसेवा

लंडन : सध्या अनेक लोक फिटनेसबाबत जागरूक आहेत. जिममध्ये जाऊन व्यायाम करणार्‍यांना अनेक वेळा प्रोटिन पावडरचे सेवन करण्याचा सल्ला दिला जात असतो. मात्र, शरीराला किती प्रोटिन्स म्हणजेच प्रथिनांची गरज असते, शाकाहारातून ते किती मिळतात हे पाहणेही गरजेचे आहे.

आहार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रथिनं जसजशी पचतात, तशी अन्नातील प्रथिनं आमिनो अ‍ॅसिडस्मध्ये विघटित होतात. हे घटक शरीराला आवश्यक असलेली कोणतीही प्रथिनं तयार करण्यासाठी पुन्हा जोडले जाऊ शकतात. हिमोग्लोबिन, एंझाइम्स, स्नायू आणि आपल्या त्वचा आणि केसांतील केराटिन- मानवी शरीरात 20,000 हून अधिक प्रथिनं आहेत. ती विविध कार्ये पार पाडतात. प्रत्येक व्यक्तीस आवश्यक असलेली प्रथिनांची मात्रा त्यांच्या वय, शरीराची रचना आणि जीवनशैलीनुसार वेगळी असू शकते. ब्रिटनमध्ये, सरकारी मार्गदर्शक सूचनांनुसार, निष्क्रिय (बैठे काम करणारे) प्रौढांसाठी सामान्य मुलभूत प्रमाण म्हणजे त्यांना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम 0.8 किंवा 0.75 ग्रॅम प्रथिनं सेवन करणं आवश्यक आहे, जर कोणाचं वजन 70 किलोग्रॅम (154 पौंड) असेल, तर त्याचा 0.8 ने गुणाकार करा म्हणजेच दररोज 56 ग्रॅम प्रथिनं लागतील. बहुतांश लोकांना त्यांच्या सामान्य आहारातून प्रमाणापेक्षा जास्त प्रथिनं मिळतात. सरासरी अमेरिकन लोक त्यांच्या एकूण कॅलरीजपैकी 14 ते 16 टक्के प्रथिनं घेतात; पण तुम्ही अधिक सक्रिय असाल तर तुमच्या प्रथिनांची गरज प्रति किलोग्रॅमसाठी 1 ग्रॅमपेक्षा जास्त असू शकते. तुम्हाला आवश्यक असलेल्या प्रथिनांचं प्रमाण हे तुमच्या वयावरही अवलंबून असतं. कारण वयोमानानुसार लोकांच्या स्नायूंची मात्रा कमी होऊ लागते. जास्त प्रथिनांचं सेवन केल्यामुळे आपण अधिक स्नायू टिकवून ठेवू शकतो. मेनोपॉज नंतरच्या महिलांनाही अधिक प्रथिनांची आवश्यकता असते. नियमित प्रशिक्षण घेणारे खेळाडू, पॉवरलिफ्टर्स किंवा बॉडी बिल्डर्स यांच्यासाठी केलेल्या संशोधनात असं आढळून आलं की, मसल प्रोटिन सिंथेसिस वाढवण्यासाठी दैनंदिन प्रोटिनची आवश्यकता प्रति किलो सुमारे 1.6-2.2 ग्रॅम (0.06-0.08 औन्स) शरीराच्या वजनावर आधारित असते. अनेक वैद्यकीय तज्ज्ञ सुचवतात की, आपल्याला आवश्यक प्रोटिन आपल्या आहारातून मिळवणं शक्य असतं. शाकाहारी लोकांसाठी अधिक नट्स, बिया आणि सोयाबीनवर आधारित उत्पादनं तसेच डाळी जसं की, बिन्स आणि मसूरसारख्या कडधान्यांचा समावेश होऊ शकतो. शाकाहारी लोकांसाठी, अंडी, दही आणि विशिष्ट प्रकारच्या चीजचा समावेशही केला जाऊ शकतो. सर्व प्रकारचा आहार करणारे यासाठी मांस आणि सी फूडचे सेवन वाढवू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT