लंडन : जगभरात आतापर्यंत कोरोना विषाणूने 8 कोटी 76 लाखांपेक्षाही अधिक लोक संक्रमित झालेले आहेत. त्यापैकी 18 लाख 91 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. कोरोना विषाणूचे नवे नवे स्ट्रेन्स सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे याविषयीची चिंताही वाढतच आहे. सध्या ब्रिटनमध्ये आढळलेला स्ट्रेन अतिशय संक्रामक मानला जात असल्याने ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. कोरोनाबाबत अद्यापही लोकांच्या मनात काही प्रश्न आहेत. त्यापैकी एक प्रश्न म्हणजे एखादी संक्रमित व्यक्ती किती दिवस कोरोनाचा फैलाव करू शकते?
एखाद्या व्यक्तीच्या शरीरात किती दिवस विषाणू राहू शकतो याबाबत लोकांना कुतुहल आहे. एका ताज्या पाहणीतून त्याबाबत खुलासा करण्यात आला असून त्याची माहिती 'द लान्सेट' या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की आतापर्यंत झालेल्या कोणत्याही पाहणीत उच्च व्हायरल लोड असूनही एखाद्या व्यक्तीच्या शरीरात नऊ दिवसांपेक्षा अधिक काळ सक्रिय विषाणूचा छडा लागलेला नाही. याचा अर्थ एखादी व्यक्ती जास्तीत जास्त नऊ दिवसच संक्रमण फैलावू शकते. कोरोना विषाणू श्वसन मार्ग आणि विष्ठेत नंतरही बराच काळ राहू शकतो. मात्र, त्यावेळी तो संक्रामक असत नाही. श्वसन मार्गाच्या वरील भागात विषाणूचा कमाल शेडिंग अवधी 83 दिवस, खालील भागात 59 दिवस, विष्ठेत 126 दिवस आणि रक्तात 60 दिवस असतो.