LPG cylinder gas | घरातील सिलिंडरमधील गॅस कसा बनवतात? 
विश्वसंचार

LPG cylinder gas | घरातील सिलिंडरमधील गॅस कसा बनवतात?

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता अधिक तणावपूर्ण वळणावर येताना दिसत आहेत. या संघर्षाच्या झळा आता संपूर्ण भारतात जाणवू लागल्या आहेत. इराण-इस्रायल युद्धामुळे या देशांमधून भारतात होणारा खनिज तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे देशात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

गॅस तुटवड्यामुळे त्याचा थेट परिणाम दैनंदिन जनजीवनावर होताना दिसत आहे. गॅसअभावी अनेक हॉटेल बंद करण्याची वेळ आली असून, असं चित्र दिसण्यास सुरुवातही झाली आहे. यामुळं आता व्यावसायिक गॅस सिलिंडरसह घरगुती गॅससाठीही नागरिकांना प्रचंड ओढाताण करावी लागत आहे. सरकारने सिलिंडर बुकिंगचा कालावधी वाढवल्यामुळं सामान्यांमध्ये अधिकच गोंधळ पाहायला मिळत असून, हे युद्ध जरी आखातात असले तरी देशातील नागरिकांचे जेवणच संकटात आल्याची वस्तुस्थिती पाहायला मिळत आहे. मात्र हा गॅस बनवतात तरी कसा हे तुम्हाला माहिती आहे का?

‘एलपीजी’ म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस किंवा ‘द्रवरूप पेट्रोलियम वायू’ असाच त्याचा अर्थ. हा प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन या दोन वायूंपासून तयार केला जातो. एलपीजी गॅस थेट जमिनीतून मिळत नाही, तर तो इतर इंधन तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान एक ‘उपउत्पादन’ म्हणून मिळतो. उपलब्ध माहितीनुसार एलपीजी तयार होण्याच्या मुख्य दोन प्रक्रिया आहेत. नैसर्गिक वायू प्रक्रिया : जमिनीखालून नैसर्गिक वायू काढला जातो, तेव्हा तो शुद्ध स्वरूपात नसतो. त्यामध्ये मिथेनसोबतच प्रोपेन, ब्युटेन हे वायूसुद्धा किंवा हे घटकसुद्धा असतात. इथं जमिनीतून काढलेला हा वायू एका मोठ्या विभाजकात पाठवला जातो, जिथं मिथेन (जो पाईपलाईनद्वारे शहरात पुरवला जातो) वेगळा केला जातो. उरलेले प्रोपेन आणि ब्युटेन वायू कमी तापमानाला थंड करून किंवा दाब देऊन वेगळे केले जातात. जगातील साधारण 60 टक्के एलपीजी याच पद्धतीने तयार केला जातो. राहिला मुद्दा उरलेल्या 40 टक्के एलपीजीचा, तर त्यासाठीसुद्धा एक अतिशय मोठी प्रक्रिया आहे.

कच्च्या तेलाचे शुद्धीकरण : एलपीजी निर्मितीचे उर्वरित प्रमाण हे तेल शुद्धीकरण प्रकल्प अर्थात रिफायनरींमध्ये कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान साध्य केले जाते. इथं सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो, ऊर्ध्वपतन (Fractional Distillation). या प्रक्रियेत एका मोठ्या ‘डिस्टिलेशन टॉवर’मध्ये कच्चं तेल प्रचंड तापमानावर गरम केले जाते, इथे ते उकळू लागल्यावर त्यातील विविध घटक त्यांच्या घनतेनुसार वेगळे होतात. या प्रक्रियेमध्ये प्रोपेन आणि ब्युटेन हे सर्वात वायू हलके असल्याने ते सर्वात वरच्या भागात जमा होतात, जिथे त्यांना एकवटून तिथेच थंड करत त्यांचे द्रवात रूपांतर केले जाते. गॅस तयार झाल्यानंतर तो थेट वापरण्यायोग्य नसतो. त्याच्यावर आणखीही काही प्रक्रिया होणे गरजेचे असते.

गॅसमधून पाणी आणि सल्फरसारखे इतर अशुद्ध घटक शुद्धीकरण प्रक्रियेत काढण्यात येतात. ज्यामुळे गॅस जळताना प्रदूषण टळते. नैसर्गिकरीत्या एलपीजीला कोणताही गंध नसतो. परिणामी गॅस गळती झाली, तर ती बाब लक्षात यावी म्हणून त्यात जाणीवपूर्वक ‘इथिल मरकॅप्टन’ नावाचे उग्र गंध असणारे रसायन मिसळण्यात येते. यामुळे जेव्हा जेव्हा गॅसचा वास येतो, तेव्हा प्रत्यक्षात तो या रसायनाचाच वास असतो. एलपीजी किंवा तत्सम वायूंना मध्यम दाबाखाली ठेवल्यास त्यांचे रूपांतर द्रवात होते. गॅस द्रवात रूपांतरित केल्यामुळे त्याचे आकारमान 270 पटींनी कमी होतं आणि यामुळे एका लहान आकाराच्या सिलिंडरमध्ये खूप जास्त ऊर्जा साठवणे शक्य असल्याने गॅस सिलिंडरमध्ये भरला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT