न्यूयॉर्क : सुमारे 6.6 कोटी (66 दशलक्ष) वर्षांपूर्वी एका महाकाय अशनीने म्हणजेच लघुग्रहाने पृथ्वीला जोरदार धडक दिली आणि संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला. या भीषण आघातामुळे वितळलेले खडक हवेत फेकले गेले, ज्यामुळे तयार झालेल्या ढगांनी पृथ्वीच्या वरच्या वातावरणाचे तापमान तब्बल 226 अंश सेल्सिअस (439 अंश फॅरेनहाइट) पर्यंत वाढवले. मेक्सिकोच्या आखातात मैलोन मैल उंच त्सुनामीच्या लाटा उसळल्या, ज्यांनी जगाच्या दुसर्या टोकापर्यंतचे महासागर ढवळून काढले.
जंगलांना लागलेल्या भीषण आगीत वनस्पती आणि प्राणी होरपळून खाक झाले, तर आघाताच्या प्रचंड धक्कादायक लहरींनी वाटेत येणार्या प्रत्येक गोष्टीचा चक्काचूर केला. याशिवाय, हवेत पसरलेल्या सल्फरच्या कणांनी सूर्यप्रकाश रोखला आणि पृथ्वीवर आम्लवर्षा सुरू झाली. या महाप्रलयात पृथ्वीवरील तब्बल 75 टक्के प्रजाती नष्ट झाल्या, ज्यात उडू न शकणार्या डायनासोरचाही समावेश होता. परंतु, अशा विनाशकारी परिस्थितीतून काही पक्षी, कासव आणि सस्तन प्राणी कसे काय वाचू शकले? शास्त्रज्ञांच्या मते, यामागचे मुख्य कारण होते त्या प्राण्यांचा ‘आकार’.
न्यू जर्सी येथील ‘रोवन युनिव्हर्सिटी’च्या एडेलमन फॉसिल पार्क आणि म्युझियमचे संस्थापक संचालक केनेथ लॅकोवारा यांनी सांगितले की ‘पृथ्वीवरील सर्वात मोठे शिकारी आणि शाकाहारी प्राणी, जसे की ‘टायरानोसॉरस रेक्स’ (T. rex), ‘ट्रायसेरॉप्स’ आणि समुद्रातील महाकाय ‘मोझासॉरस’, अशनीच्या धडकेच्या पहिल्या क्षणापासूनच धोक्यात आले होते. त्यांच्या अवाढव्य आकारामुळे सुरुवातीच्या स्फोटात त्यांना सर्वाधिक इजा झाली. तसेच, महाप्रलयानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांना कुठेही लपता आले नाही आणि अन्नटंचाईच्या काळात जगण्यासाठी त्यांना प्रचंड प्रमाणात अन्नाची गरज होती, जी पूर्ण होऊ शकली नाही.
‘लॅकोवारा यांच्या मते, पृथ्वीवर जगण्यासाठी प्राण्यांचा आकार लहान असणे आणि त्यांनी बिळे करून राहणे अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्या काळातील काही सरडे आणि सस्तन प्राणी हे ‘बॅजर’ (एक लहान केसाळ प्राणी) पेक्षा मोठे नव्हते. लहान आकारामुळे त्यांना तत्कालिक आणि दीर्घकालीन संकटांपासून वाचण्यासाठी सुरक्षित आश्रय शोधणे सोपे गेले. कमी अन्न लागणारे लहान कासव आणि मासे पाण्यात सुरक्षित राहिले. आधुनिक पक्ष्यांचे पूर्वज लहान होते आणि त्यांचे पंख व छातीचे स्नायू मजबूत होते.
यामुळे ते उडून संकटातून सुटू शकले आणि अन्नाचे नवीन स्रोत शोधू शकले. तसेच, त्यांची पिल्ले वेगाने मोठी होत असल्याने त्यांना पालकांवर जास्त काळ अवलंबून राहावे लागले नाही. या महाविनाशकारी घटनेनंतर पृथ्वीवरील प्राण्यांच्या सरासरी आकारात मोठा बदल झाला. जमिनीवर वाचलेले बहुतांश मोठे प्राणी हे जास्तीत जास्त घरातील मांजराच्या आकाराचे होते, तर पाण्यात वाचलेले सर्वात मोठे जीव हे एका सामान्य शार्कच्या आकाराचे होते. याच लहान जीवांनी पुढे जाऊन आजच्या आधुनिक जगाची पायाभरणी केली.