लंडन : जगभरात दरवर्षी ३० ते ५० लाख लोक एन्फ्लुएन्झा म्हणजेच फ्लूच्या विळख्यात अडकतात. यापैकी सुमारे ६.५ लाख लोकांचा मृत्यू होतो. विशेषतः 'एन्फ्लुएन्झा ए' व्हायरसने याआधीही अनेकदा मोठ्या महामाऱ्यांचे रूप धारण केले आहे. आता हा विषाणू मानवी पेशींच्या आत कसा पसरतो आणि आपल्या गरजेनुसार पेशींवर कसा ताबा मिळवतो, हे समजून घेण्यात वैज्ञानिकांना मोठे यश मिळाले आहे. हे संशोधन 'नेचर मायक्रोबायोलॉजी' या प्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
युरोपियन मॉलिक्युलर बायोलॉजी लॅबोरेटरी (EMBL) हॅम्बर्ग आणि लाइब्निझ रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर मॉलिक्युलर फार्माकोलॉजी (FMP) च्या संशोधकांनी पहिल्यांदाच फ्लू व्हायरस संक्रमित मानवी पेशींमधील प्रथिनांशी कसा संपर्क साधतो, याचा शोध लावला आहे. एका विशेष तंत्रज्ञानाच्या मदतीने वैज्ञानिकांनी व्हायरस आणि मानवी पेशींचे प्रथिन एकमेकांशी कसे जोडले जातात आणि व्हायरस या यंत्रणेचा स्वतःच्या फायद्यासाठी कसा वापर करतो, याचे निरीक्षण केले. सामान्यतः जेव्हा वैज्ञानिक व्हायरस आणि पेशींमधील घडामोडींचा अभ्यास करतात, तेव्हा त्यांना पेशी फोडाव्या (विभक्त कराव्या) लागतात. त्यानंतरच आत असलेल्या प्रथिनांची तपासणी करता येते. परंतु, या पद्धतीत एक अडचण असते; पेशी फुटल्यानंतर अनेक असे संपर्क दिसू शकतात जे प्रत्यक्षात शरीराच्या आत कधी झालेच नव्हते, तर काही महत्त्वाचे आणि नाजूक संपर्क नष्ट होऊन जातात. या समस्येवर मात करण्यासाठी वैज्ञानिकांनी 'क्रॉस-लिंकिंग मास स्पेक्ट्रोमेट्री' (XL-MS) नावाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे संक्रमित पेशी न फोडताही कोणते प्रथिन कोणाच्या संपर्कात आहे, हे स्पष्टपणे पाहता येते.
EMBL हॅम्बर्गच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, या पद्धतीमुळे पहिल्यांदाच फ्लू व्हायरस आणि मानवी पेशींमधील थेट संपर्क संसर्गाच्या वेळी जसा शरीरात असतो, अगदी तशाच मूळ स्थितीत पाहता आला. संशोधकांनी यानंतर कॉम्प्युटर मॉडेलिंगच्या मदतीने व्हायरस आणि मानवी प्रथिने रचनेच्या दृष्टीने एकमेकांशी कशी जोडली जातात, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी ‘अल्फाफोल्ड’ तंत्रज्ञानाच्या एका विशेष स्वरूपाचा वापर केला. प्रथिनांची रचना समजून घेण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या अभ्यासातून दोन महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत : पहिला निष्कर्ष: व्हायरसचे मुख्य प्रथिन ‘हिमॅग्लुटिनिन’ मानवी पेशींच्या आत स्वतःचा मार्ग कसा तयार करते, हे स्पष्ट झाले. हेच प्रथिन व्हायरसला पेशीशी जोडण्यास आणि आत प्रवेश करण्यास मदत करते. मानवी पेशींमधील काही प्रथिने या हिमॅग्लुटिनिनला योग्य प्रकारे तयार होण्यास आणि त्याची रचना विकसित करण्यास मदत करतात, असे संशोधनात आढळले. यापैकी काही प्रथिनांच्या भूमिकेबद्दल पूर्वी फारशी माहिती उपलब्ध नव्हती. या शोधामुळे भविष्यात अँटी व्हायरल औषधांचे नवे लक्ष्य विकसित करण्यास मदत होईल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. दुसरा निष्कर्ष : पेशीच्या केंद्रात असलेल्या ‘पॅरास्पेकल्स’शी संबंधित आहे. एन्फ्लुएन्झा ए व्हायरस संसर्गादरम्यान या संरचना विघटित करतो, असे या अभ्यासात दिसून आले आहे.