वॉशिंग्टन : व्हेल शार्क हा समुद्रातील सर्वात मोठ्या माशांपैकी एक असला, तरी त्याच्या खाण्याच्या सवयी नेहमीच शास्त्रज्ञांसाठी एक गूढ राहिल्या आहेत. आता या अथांग जीवाला पाठीवर कॅमेरा लावून टिपलेल्या नवीन फुटेजमध्ये शास्त्रज्ञांना अत्यंत दुर्मीळ असे दृश्य पाहायला मिळाले आहे. समुद्राच्या पृष्ठभागापासून खूप खाली (तळाशी) हे मासे शिकार करताना दिसून आले आहेत.
या फुटेजवरून असे स्पष्ट होते की, व्हेल शार्क (Rhincodon typus) शास्त्रज्ञांच्या अंदाजापेक्षा कितीतरी जास्त वेळ पाण्याखाली अन्न शोधण्यात घालवतात. तसेच अन्न शोधण्यासाठी ते ज्या विविध पद्धतींचा वापर करतात, त्या आजवर कधीही नोंदवल्या गेल्या नव्हत्या. या व्हिडीओंमध्ये व्हेल शार्क मोकळ्या पाण्यात पोहत अन्न गाळून खाताना, खोल सूर मारताना (डायव्हिंग करताना) खाली सरकत अन्न मिळवताना, तोंड उघडे ठेवून पुन्हा वरच्या दिशेने पोहताना आणि थेट समुद्राच्या तळाशी राहून अन्न शोधताना दिसून आले आहेत. संथ आणि हळूवारपणे पाण्याखाली अन्न खाणे ही या व्हेल शार्कची सर्वात मुख्य क्रिया असल्याचे समोर आले आहे.
या अभ्यासात समाविष्ट नसलेले युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ फ्लोरिडा येथील बायोलॉजीचे प्राध्यापक एमिरिटस फिलीप मोटो यांनी सांगितले की, व्हेल शार्कच्या खाण्याच्या बदलत्या सवयींवर हे व्हिडीओ अत्यंत मोलाची नवीन माहिती देतात. कारण आजवर या सवयींची पुरेशी नोंद झालेली नव्हती. या अभ्यासापूर्वी, व्हेल शार्कचा अभ्यास बोटींमधून, विमानांतून किंवा त्यांच्यासोबत पोहणाऱ्या डायव्हर्सद्वारे केला जात असे. परंतु या सर्व पद्धतींना एक मर्यादा होती, ते फक्त शार्क जेव्हा पृष्ठभागाजवळ असायचे तेव्हाच त्यांचे निरीक्षण करू शकत होते.
पूर्वीच्या काही संशोधनांनी असा इशारा दिला होता की, व्हेल शार्क त्यांच्या वेळेतील मोठा भाग दृष्टीआड, विविध खोलीवर अन्न शोधण्यात घालवतात. २०२० च्या एका अभ्यासात संशोधकांनी असा अंदाज लावला होता की, व्हेल शार्क दिवसातील सुमारे २० टक्के वेळ या खोलीवर अन्न शोधू शकतात, तर पृष्ठभागावर ते त्यांच्या वेळेच्या एक टक्क्यापेक्षाही कमी वेळ अन्न खातात. मात्र, या नव्या अभ्यासात शास्त्रज्ञांनी थेट व्हेल शार्कच्या पाठीवर कॅमेरे बसवले, ज्यामुळे समुद्राच्या लाटांखालील शार्कच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहण्याची एक अत्यंत दुर्मीळ संधी मिळाली आहे.