ऑक्सिजनशिवाय सूर्य कसा धगधगतो? 
विश्वसंचार

ऑक्सिजनशिवाय आग जळू शकत नाही, मग सूर्य कसा धगधगतो?

Sun Burning : काय आहे यामागचे कारण?

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : ऑक्सिजनशिवाय उष्णता, प्रकाश निर्माण करणारा तारा म्हणजे सूर्य .जसे आग हे पंचतत्त्वांपैकी एक महत्त्वाचे तत्त्व, तसे कोणतीही गोष्ट जळण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असतो. ऑक्सिजनशिवाय पृथ्वीवर आग लागू शकत नाही. यासंबंधित प्रयोग देखील आपण शाळेत केले आहेत. जेव्हा आपण जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवतो तेव्हा ऑक्सिजन संपल्यावर ती मेणबत्ती आपोआप विझते. पण, मग असं असेल तर एक प्रश्न सहज उपस्थित होतो की अवकाशात ऑक्सिजन नसताना सूर्य कसा धगधगतो? जशी पृथ्वीवर आग लागण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते, तशीच सूर्यालाही लागते का? याचं उत्तर नकारार्थी आहे.

असेही वाटू शकते की, सूर्यदेखील पृथ्वीवरील इंधन जळते तसाच जळतो, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. नासाच्या माहितीनुसार, सूर्य हा जळत नाही, तर तो चमकतो. सूर्य हा पूर्णतः गॅसपासून बनलेला एक महाकाय गोळा आहे, जिथे परमाणु संलयन नावाची प्रक्रिया सुरू असते. या प्रक्रियेत हायड्रोजन अणू प्रचंड वेगाने एकमेकांना धडकतात आणि ते हेलियममध्ये रूपांतरित होतात. या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते आणि तीच ऊर्जा सूर्याच्या प्रकाश आणि उष्णतेचं प्रमुख कारण ठरते.

सूर्यातून बाहेर पडणारी ऊर्जा आजूबाजूच्या इतर घटकांना उष्ण करतात. या ऊर्जेमुळे सूर्याच्या केंद्रातील तापमान प्रचंड वाढते आणि बाहेरच्या थरांपर्यंत पोहोचते. नंतर सूर्याच्या पृष्ठभागावरून ही ऊर्जा अंतराळात उत्सर्जित होते आणि प्रकाशाच्या स्वरूपात पृथ्वीवर पोहोचते. यामुळेच आपण सूर्यप्रकाश पाहू शकतो. काही वेळा असे म्हटले जाते की, सूर्य चमकण्यासाठी हायड्रोजन जळतो, पण हे तितकसे खरे नाही. हायड्रोजन प्रत्यक्षात जळत नाही, तर तो परमाणु संलयन प्रक्रियेत हेलियममध्ये बदलतो. यासाठी कोणत्याही ऑक्सिजनची गरज लागत नाही. त्यामुळे ऑक्सिजनशिवाय सूर्य सतत चमकत राहतो. त्यामुळे यामागील कारण हेच आहे की, सूर्य हा इंधन जाळणार्‍या आगीसारखा नाही, तर तो अणू ऊर्जेच्या शक्तीने धगधगणारा तारा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT