Woodpecker | सुतार पक्षी कोणतीही दुखापत न करून घेता कसा करतो लाकडात छेद? 
विश्वसंचार

Woodpecker | सुतार पक्षी कोणतीही दुखापत न करून घेता कसा करतो लाकडात छेद?

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्‍ली : निसर्गाने प्रत्येक जीवाला एक वेगळी देणगी दिली आहे. पक्षी जगतातील ‘सुतार पक्षी’ (Woodpecker) हा नैसर्गिक इंजिनिअरिंगचा एक उत्तम नमुना मानला जातो. झाडाच्या खोडात स्वतःला कोणतीही दुखापत न करून घेता ताकदीने छेद करण्यात हा पक्षी अत्यंत निष्णात असतो. त्याच्या या क्षमतेमागे फक्त त्याची चोच नसून संपूर्ण शरीराचे एक क्लिष्ट आणि अचूक तंत्र काम करत असल्याचे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे.

‘जर्नल ऑफ एक्‍सपेरिमेंटल बायोलॉजी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, सुतार पक्षी जेव्हा झाडावर चोचीने वार करतो, तेव्हा तो फक्त डोके किंवा चोच हलवत नाही, तर संपूर्ण शरीराचा वापर एका ताळमेळ असलेल्या ‘फोर्स-डिलीवरी मेकॅनिझम’सारखा करतो. सुतार पक्षी जेव्हा झाडावर वार करतो, तेव्हा त्याच्या शरीराचे पुढील भाग एकत्र काम करतात: स्नायूंचा वापर : वार करताना त्याच्या कंबरेचे आणि मानच्या समोरील बाजूचे स्नायू शरीराला वेगाने पुढे ढकलतात, ज्यामुळे चोच अचूक आणि वेगाने लक्ष्यावर पोहोचते.

पोटाचे स्नायू व शेपूट : पोटाचे स्नायू धड स्थिर ठेवतात, तर त्याची शेपूट झाडाच्या खोडाला टेकून एखाद्या ‘किकस्टँड’प्रमाणे शरीराला आधार देते, जेणेकरून पक्षी घसरणार नाही. डोके आणि मानेची ताकद : कवटीच्या खालील भागाचे आणि मानेचे स्नायू डोक्याला एकाच जागेवर घट्ट पकडून ठेवतात. यामुळे आघाताची सर्व ऊर्जा पक्ष्याला दुखापत न पोहोचवता थेट झाडावर केंद्रित होते. या अभ्यासातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सुतार पक्ष्याच्या श्वासोच्छ्वासाची पद्धत. सुतार पक्षी जेव्हा वेगाने ‘ठक-ठक’ करतो, तेव्हा प्रत्येक वारासोबत तो वेगाने श्वास सोडतो. यामुळे त्याच्या शरीराचा मध्य भाग टणक होतो आणि ऊर्जेचे वहन अधिक प्रभावीपणे होते. तो जेव्हा अत्यंत वेगाने वार करत असतो, तेव्हा एका सेकंदात अनेक वेळा अत्यंत लहान श्वास घेतो.

श्वासोच्‍छ्‍वास आणि प्रहार यांच्या या अचूक ताळमेळामुळे त्याला कोणतीही दुखापत होत नाही आणि तो जास्तीत जास्त ताकदीने वार करू शकतो. पक्ष्यांच्या विश्वाव्यतिरिक्त, सुतार पक्ष्याची ही पद्धत मानवासाठी आणि तंत्रज्ञानासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. धक्के सहन करणारे रोबो (Shock-resistant robots) किंवा सुरक्षिततेची साधने बनवणारे इंजिनिअर्स सुतार पक्ष्याच्या शरीरातील या ‘डिस्ट्रीब्युटेड स्टिफनेस सिस्टम’चा (शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी असणारी मजबुती) अभ्यास करून नवीन तंत्रज्ञान विकसित करू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT